By : Polticalface Team ,01-08-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)--अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम न मिळाल्यामुळे ओरीयंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा आलेल्या शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगाम २०२३ - २४ चा पीक विमा न मिळाल्यामुळे पुणे येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा आंदोलन जाहीर करण्यात आले होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे, नगर जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक, विनायक दीक्षित यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केल्या नंतर ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले. विमा कंपनीला केंद्र सरकार कडून ९९.२८ कोटी रुपये येणे आहे व राज्य शासनाकडून १९२७.५२ कोटी रुपये विमा हप्त्याची रक्कम येणे बाकी आहे. ती तीन आठवड्यात मिळेल अशी खात्री असल्यामुळे ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व रक्कम अदा होईल असे आश्वासन विनायक दीक्षित यांनी दिले आहे.
३१ ऑगस्ट पर्यंत विमा रक्कम अदा न केल्यास, ३ सप्टेंबर २०२४ रोजी कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आंदोलन करण्यात येईल असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले.
वाचक क्रमांक :