By : Polticalface Team ,11-08-2024
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील बहुचर्चित झरे येतील रातोरात सुस्थितीत असलेली अंगणवाडी नेस्तनाबूत करून त्याचे लवलेशी न ठेवता चिमुकल्या अंगणवाडीतील बालकांना उघड्यावर आणण्याचा प्रकाराला तीन महिने उलटूनही संबंधितावर गुन्हा दाखल न झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर शासकीय मालमत्तेचं नुकसान झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे वरिष्ठाच्या आदेशाला केराच्या टोपलीत फेकण्यात आल्याने ग्रामस्थांनी पुन्हा स्थगित केलेले उपोषण पुन्हा १४ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे की, झरे येथील २०१३ मधील बांधलेली अंगणवाडी ची इमारत हे सुस्थितीत होती. मंजूर जागेत इमारत बांधणे आवश्यक असताना त्याची मंजुरी इतरत्र असताना ही इमारत गावातील मुलांच्या सोयीसाठी गावात उभारली होती. तरीही इमारत सुस्थितीत असतानाही गावातीलच काही लोकांनी वीस एप्रिल २४ रोजी च्या रात्री राजकीय व आर्थिक फायद्यासाठी एका रात्रीत कोणत्यातरी मशिनरीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. पडलेलं मटेरियल ही रात्रीत गायब करून टाकले. इमारत पाडणार असल्याची चर्चा गावामध्ये यापूर्वीच होती. तशी ती माहिती आपण ग्रामसेवकांना व प्रशासनाला आपण लेखी पत्राद्वारे दिली होती. तरीसुद्धा या इमारतीच्या संरक्षणासाठी प्रशासनाने काहीच हालचाल केले नाही. याउलट प्रशासनाने संगनमत केल्याप्रमाणे संबंधित लोकांना अभय देऊन ही इमारत पाडली आहे असा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे आता येथील बालकांना हक्काची अंगणवाडी भुईसपाट झाल्याने नावीलाजाणे आता कोठेतरी एखाद्या खोलीमध्ये अंगणवाडीतील शिक्षण घ्यावे लागत आहे. याबरोबरच गावातील विविध कामांमध्ये भ्रष्टाचारही झाला आहे असा संशय असून याची चौकशी व्हावी म्हणून या संबंधात आपण वेळोवेळी लेखी पत्र दिले होते .याचीही शहनिशा करण्यात आली नाही. त्यामुळे सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर २४ जुलै रोजी उपोषण केले होते .यावेळी पंधरा दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. या लोकांनी ही बाब ही गांभीर्याने न घेता केवळ पानावर पान टाकून थातूरमातूर खुलासा दिला आहे. अद्यापही गुन्हा संबंधित लोकांवर दाखल न करता केवळ पूर्वीच पत्र दिलेचां उल्लेख केला आहे. यात काहीही बदल झालेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल व्हावा म्हणून पत्र दिले होते ते पत्रही स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकून दिले आहे. केवळ पोलीस ठाण्यामध्ये पत्र देऊन त्यांनी हात झटकले आहेत. पोलिसांनीही याचे गांभीर्य न घेता साधे पत्र समजून तगादा नसल्याने कसलीही कारवाई केलेली नाही. गुन्हा दाखल तर केलेलाच नाही. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्याला शोधण्यासाठी व इतर मागण्यासाठी पुन्हा १४ ऑगस्ट रोजी करमाळा येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या आवारामध्ये आमरण उपोषण करीत असल्याचे सोमनाथ जाधव, दत्तात्रय सुरवसे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे . याच्या प्रती सर्व वरिष्ठांना दिलेले असून वरिष्ठांनी करमाळा येथील पंचायत समिती व बालविकास प्रकल्प विभागाच्या बेताल कारभारावरच्या संदर्भात चौकशी करून जबाबदारी झटकणाऱ्या कर्मचारी अधिकारी व संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर सोमनाथ जाधव, दत्तात्रय सुरवसे आदी नागरिकांच्या सह्या आहेत.
राजरोसपणे चांगल्या उत्तम स्थितीत असलेल्या शासनाच्या मालकीच्या इमारती पाडून त्याचे तासा दोन तासात विल्हेवाट लावली जाते. याबाबत जबाबदार शासकीय अधिकारी याला गांभीर्याने घेत नाहीत. वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडवले जातात. काहीही थातुरमातुर कारण सांगून जाब विचारणाऱ्या लोकांना ग्रामसेवकापासून अधिकारी पर्यंत सर्वांचे उद्दाम वर्तन लोकांना अनुभवायला मिळत आहे. असा जर बेफाम कारभार चालू राहिला तर राजकीय व शासकीय लोकांवर वचक कसा बसणार? शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रकार घडत राहिल्यास कसे होणार? याला पायबंद बसणार आहे का नाही? हे थांबणार आहे का नाही? यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. यावेळी घडणाऱ्या दूरघटनेला संबंधित अधिकारी वर्ग जबाबदार राहील.... सोमनाथ जाधव ,दत्तात्रय सुरवसे (उपोषणकर्र्ते )