By : Polticalface Team ,15-09-2024
जनआधार न्युज बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव मो.9112131616 बारामती केंद्राच्या वयोश्री आणि एडीप योजना राबविताना उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि पूर्वतपासणी झालेल्या बारामती लोकसभा मतदार संघाला निधी नसल्याचे कारण दिले असून त्याच वेळी आपल्याच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मात्र 17 सप्टेंबर रोजी या योजनेतील साधने वाटप होत आहेत.हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून तातडीने निधी उपलब्ध करून दिला नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. तोंडे पाहून विद्यमान सरकार देशातील गोरगरीब जनतेला न्याय देते का, असा सवाल करुन सुळे म्हणतात, वयोश्री आणि एडीप योजने अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने मिळावीत यासाठी बारामती तालुक्यातील सर्व गावांमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांची पूर्वतापसणी झाली आहे.त्यांना साधने मिळावीत यासाठी गेली दोन वर्षे आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यात या योजनांचे काम उत्तम झाले आहे.
जिल्ह्यात पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली. दोन्ही योजनांखाली वितरीत होणाऱ्या सहाय्यभूत साधनांचे वाटप निधीअभावी अद्यापही करता आले नाही. यासाठी केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांची वारंवार भेट घेऊन पाठपुरावा केला, आंदोलन केले, संसदेत प्रश्न मांडला परंतु आम्हाला ‘निधी उपलब्ध नाही’ असे कारण वारंवार दिले जाते.केंद्राकडे साधनांचे वाटप करण्यासाठी निधी नाही तर एकाच तालुक्यासाठी साधनांचे वाटप करण्यासाठी तो कसा उपलब्ध झाला? शासनाने एखादी योजना राबविताना समान संधीचे धोरण ठेवले पाहिजे.
येथे केवळ सत्तेच्या जवळ असणाऱ्यांनाच जाणीवपूर्वक निवडून निधी दिला जात असेल आणि इतरांना मात्र वंचित ठेवले जात असेल तर हा दुजाभाव अक्षम्य आहे.शासनाने बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ‘वयोश्री’ आणि ‘एडिप’ च्या लाभार्थ्यांना सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची गरज आहे. अन्यथा या साठी लाभार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा सुळे यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक :