By : Polticalface Team ,24-10-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी) श्रीगोंदा पंचायत समिती शिक्षण विभाग, श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी विद्या निकेतन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोशी वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या मतदान जागृती अभियान अंतर्गत मतदार जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी मार्गदर्शन केले. “भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जिथे प्रत्येक प्रौढ नागरिक आपल्या मताचा वापर करण्यास स्वतंत्र असतो. सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदारांची महत्वाची भूमिका असते. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमुल्य आहे. एक-एकच्या मताने सरकार बनते आणि बिघडते. म्हणून, प्रत्येकाने निःपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे, आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग निश्चित केला पाहिजे, तसेच देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचीवर येऊ शकेल. आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. मतदार त्यांच्या मताचा उपयोग राष्ट्र उभारणी आणि विकासात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी करू शकतात. देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत आपले मत वापरावे कारण प्रत्येक मत देशाच्या भविष्यातील भागीदार बनते. भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार जनतेसमोर आपले विचार व अजेंडा मांडतात. दुसरीकडे, ज्या उमेदवाराच्या अजेंड्यावर बहुतेक लोक आपली संमती व्यक्त करतात आणि सर्वाधिक मतदान करतात, त्याच उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जाते आणि ते देशातील सर्व विकासात्मक कामांसाठी जबाबदार असतात. म्हणून, प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मताधिकारांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनीही आपले मत व्यक्त केले. “सशक्त राष्ट्राची सुरुवात तुमच्या मताने होते. प्रत्येक नागरिकासाठी मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, निरोगी लोकशाही निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच, त्यांनी मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केले पाहिजेत आणि सरकारकडून वैध ओळखपत्र मिळविले पाहिजेत. शेवटी, हे जाणून घ्या की ते फक्त आपला हक्कच नाही तर आपले कर्तव्य देखील आहे. निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविलं तर त्याला तुम्ही भुलू नका.”
सकाळ सत्रात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. प्रभात फेरीचे नियोजन पर्यवेक्षक अनिल जाधव, आरती परकाळे, पुष्पा काळे, वर्षा दरेकर, सुरेखा काळे, संदीप गायकवाड, कल्पक राऊत, शिवाजी क्षीरसागर, मंगेश काकडे, भाऊसाहेब राऊत, माऊली जाधव यांनी केले.
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम भुजबळ, केंद्रप्रमुख अलका भालेकर, मुख्याध्यापक सुरेश हराळ, माजी मुख्याध्यापक लहू दरेकर, बन्यामीन पवार, बाळकृष्ण रोटकर, शैला जगताप, शमिना शेख व समस्त मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :