By : Polticalface Team ,12-12-2024
करमाळा प्रतिनिधी -
तालुक्यातील केडगाव येथील तरुणाच्या मृत्यु प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा पोलीस प्रमुख (सोलापूर ग्रामीण) व करमाळा पोलीस निरीक्षक यांना ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुरावे असतानाही करमाळा पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत कोणतीही दखल न घेतल्याने मयताच्या पित्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील केडगाव येथील अरबाज महंमद पठाण या तरुणाच्या मृत्यु प्रकरणी करमाळा पोलीसांत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला होता. मात्र मयत अरबाज पठाण यांचे आई-वडिल व ग्रामस्थांनी अरबाज पठाण याचा अपघात नसून घातपाती मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला होता. या घटनेच्या सखोल तपासाबाबत त्यांनी वेळोवेळी करमाळा तहसिल व पोलीस स्टेशन कार्यालयावर निषेध मोर्चे काढलेले होते तसेच वेळोवेळी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. परंतु पोलीसांनी यावर कुठलीही दखल घेतली नव्हती.
त्यामुळे महंमद गफूर पठाण यांनी अरबाज पठाण याच्या घातपाताच्या सखोल तपासासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करून सुनावणीवेळी करमाळा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. शिंदे यांना सदर गुन्ह्याबाबत सि.डी.आर., सी.सी. टीव्ही फुटेज व अन्य पुरावे असताना देखील चौकशी न केल्याने खडेबोल सुनावले व अरबाज पठाण याच्या मृत्युबाबत पुन्हा एकदा सखोल चौकशी करून सी. सी. टीव्ही फुटेज, सी.डी.आर फुटेज व अन्य पुरावे गोळा करून ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) व करमाळा पोलीस निरीक्षक यांना आदेश दिलेले आहेत. तसेच सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अहवालासह करमाळा पोलीस व जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) यांना मुंबई उच्च न्यायालयात समक्ष हजर राहण्याबाबतही आदेशीत केलेले आहे.
सदर याचिका महमंद गफूर पठाण यांचे वतीने ॲड. सचिन देवकर (मुंबई) व ॲड. अलिम हामजेखान पठाण करमाळा यांनी दाखल केलेली आहे.
वाचक क्रमांक :