By : Polticalface Team ,16-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील कुरुमकर परिवाराच्या ज्येष्ठ मातोश्री जिजाबाई माधवराव कुरुमकर (105) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले कै. जिजाबाई कुरुमकर ह्या दिवंगत माधवराव गोविंद कुरुमकर यांच्या धर्मपत्नी होत्या. या कुटुंबीयांचा पाठीमागील जीवनपट पाहिल्यानंतर अंगावर शहरे येतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपल्या जीवनाचे सोने करतानाचा तो क्षण अत्यंत संघर्षमय व खडतर होता.कै. जिजाबाई कुरुमकर ह्या गावातीलच भगत कुटुंबीयांच्या होत्या त्यांचा विवाह लिंपणगावातील सर्वसामान्य परिवारातील माधवराव कुरुमकर यांच्याशी झाला. माधवराव कुरुमकर हे जुन्या पिढीतील ट्रक ड्रायव्हर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध होते. दुसऱ्यांच्या माल ट्रकवर जवळपास 25 ते 30 वर्ष ड्रायव्हर म्हणून काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. पुढे त्यांनी स्वतःची माल ट्रक घेण्याचा निश्चय केला. परंतु घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने ड्रायव्हर म्हणून काम करत असताना अखेर त्यांनी जुनी मर्सिडीज गाडी घेतली. त्यातून त्यांनी आपल्या ट्रक व्यवसायाला सुरुवात केली. सहा मुले आणि तीन मुली असा प्रपंचाचा गाडा सांभाळत या व्यवसायातून ते यशस्वी झाले. यामध्य जिजाबाईंचे मोठे योगदान होते.पुढे मुलांनी देखील आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी ट्रक व्यवसायामध्ये जिद्दीने सहभाग घेतला. वडिलांना मोठा आधार झाला. त्यामध्ये थोरला मुलगा हरिभाऊ कुरुमकर व दुसरे चिरंजीव पंडितराव कुरुमकर यांनी या ट्रक व्यवसायामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे स्वतः ट्रक चालून ट्रक व्यवसाय वाढवले. जवळपास पाच ते सहा ट्रक घेतल्यानंतर साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करत आपल्या ट्रक धंद्याची एक आगळीवेगळी लाईन बसवली. ट्रक व्यवसायाचा पसारा वाढत असताना त्यांच्या मातोश्री कै जिजाबाई कुरुमकर व त्यांच्या ज्येष्ठ कन्या कै. कमलबाई यांनी संपूर्ण कुटुंबाची देखभाल सांभाळली. त्यामध्ये जिजाबाई कुरुमकर यांनी एकत्रित कुटुंबात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
पुढे पुढे द्वितीय चिरंजीव पंडितराव कुरुमकर यांनी स्वतःचे कुरुमकर ट्रान्सपोर्ट म्हणून जिल्ह्यात आपला या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. त्यांना मातोश्री जिजाबाई कुरुमकर यांनी मोठे आर्थिक पाठबळ दिले. आज संपूर्ण राज्यामध्ये कुरुमकर ट्रान्सपोर्ट मार्फत उत्तम प्रकारे व्यवसाय चालू आहेत. या ट्रान्सपोर्टचा असंख्य ट्रक वाहतूक करताना दिसत आहेत. त्यामागे देखील जिजाबाईंचे योगदान आहे. एक ट्रक धंद्याच्या माध्यमातून कुरुमकर परिवाराला जे सुखाचे दिवस आले. ते केवळ जिजाबाई कुरुमकर यांच्या खंबीर साथ व पाठबळामुळेच हा परिवार यशस्वी झालेला आहे. एवढेच नव्हे तर मुलगा हरिभाऊ कुरुमकर हे जवळपास दहा ते बारा वर्षे लिंपणगावचे सरपंचपदावर कार्यरत राहिले. त्यानंतर नागवडे कारखान्याचे संचालक पद देखील उपभोगले. तर पाच नंबरचे चिरंजीव अरविंद कुरुमकर यांनी देखील गावचे सरपंचपदी; सेवा संस्थेचे चेअरमन व पंचायत समितीचे सदस्य म्हणून राजकीय क्षेत्रात उत्तम प्रकारे त्यांनी काम पाहिले. गावच्या विकासात या कुटुंबाचा मोठा वाटा दिसून आला. त्याबरोबरच त्यांचे नातू राजेंद्र कुरुमकर यांनी देखील सेवा संस्थेचे मागील वर्षी चेअरमन म्हणून उत्तम प्रकारे काम केले. यामागे जेष्ठ माता जिजाबाई कुरुमकर यांचेच पाठबळ लाभले. त्यामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कुटुंबीयांनी काम करताना अत्यंत प्रामाणिक व निस्वार्थपणे समाजसेवा केल्याचे दिसून येते. जिजाबाई यांच्या पतीचे जवळपास 25 वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांचा गाडा सक्षमपणे पुढे चालवला. एकत्रित कुटुंब कसे चालवावे हे जिजाबाई माता यांच्याकडून घेण्यासारखे आहे. त्यांनी कुठेही कुटुंबाला कसल्याही प्रकारची उणीव भासू दिली नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊमातांनी प्रत्येक संघर्षामध्ये पाठबळ दिले. मार्गदर्शन केले. म्हणूनच शिवाजी महाराज यांनी आपले संपूर्ण देशाला कर्तृत्व दाखवून दिले. त्याचप्रमाणे जिजाबाई कुरुमकर यांनी आपल्या मुलांना ज्या ज्या क्षेत्रात सहभागी होतील. त्या त्या क्षेत्रात जिजाबाई या सक्षमपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच या कुरुमकर परिवाराची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ओळख निर्माण झाली. हे केवळ जिजाबाई कुरुमकर यांच्यामुळेच शक्य झाले आहे. त्यांच्या परिवारातील नातवंडे देखील विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. अशा या सुसंस्कारित घराण्यातील थोर जुन्या पिढीतील जेष्ठ माता जिजाबाई कुरुमकर यांचे अचानक निधनाची बातमी समजताच. अनेकांनी हळहळ व्यक्त करत शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात सहा मुले; दोन मुली; सुना; नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या नागवडे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ कुरुमकर व माजी सरपंच अरविंद कुरुमकर व कुरुमकर ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा पंडितराव कुरुमकर यांच्या त्या मातोश्री होत. लिंपणगाव येथील समस्यांनभूमीत जिजाबाई कुरुमकर यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील राजकीय; सामाजिक; शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यविधी प्रसंगी अनेकांनी यावेळी जिजाबाई कुरुमकर यांच्या जीवनपटावर प्रकाशज्योत टाकत श्रद्धांजली अर्पण केली.
शब्दांकन
नंदकुमार कुरुमकर पत्रकार लिंपणगाव
वाचक क्रमांक :