By : Polticalface Team ,2025-05-18
लिंपणगाव (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस गेल्या दोन ते तीन दिवसापासून थांबायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकट उभे करणारा हा अवकाळी पाऊस समजला जातो. रविवारी 18 मे रोजी सकाळी सात वाजताच विजेच्या कडकडाट होऊन श्रीगोंदा तालुक्यात बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसात विजेचा अनेक भागात लखलखाट दिसून आला. 18 मे रोजी तीन तास या ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. तर श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील साहेबराव आंबू ओहोळ यांच्या गोठ्याशेजारीच वीज कोसळल्याने या विजेच्या तीव्रतेमुळे गोठ्यापर्यंत विजेचा धक्का लागला. त्या गोठ्यातील अंदाजे दीड लाख रुपये किमतीच्या दोन म्हशींचा अंत झाला. सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता अत्यंत गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने जनजीवन अनेक भागात विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये अवकाळी पावसात विजेचा लखलखाट होत असल्याने या अवकाळी पावसाची शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी मोठी धास्ती घेतली आहे. अवकाळी पावसाच्या पूर्वसंध्येला दोन म्हशींचा बळी गेल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिना म्हटले की लाही लाही करणारे ऊन सर्वांनाच नकोसे होते. या अतिउष्णतेमुळे लहान बालकांसह आजारी व्यक्तींना देखील उस्माघाता सारखा प्रकार होत आहे. या अति उष्णतेमुळे अनेक दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींना पहाटे हार्ट अटॅकचे देखील प्रमाण वाढले आहे. अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानीचा पाऊस समजला जातो. फळबागा; कांदा इत्यादी पिकांना हा पाऊस अत्यंत मारक ठरतो. त्यामध्ये शेतकऱ्यांची देखील मोठी धांदल उडते.
दरम्यान गेल्या तीन दिवसापासून दिवसभर ऊन दुपारी पाच वाजता ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस बरसला जातो. अशा परिस्थितीत उघड्यावरील कांदा झाकण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये प्रथमच सकाळी मेघगर्जनेस अवकाळी पाऊस बरसल्याने या वातावरणात कोणालाच घर सोडता आले नाही. अशा परिस्थितीत तालुक्यातील पिसोरेखांड येथे गावात अचानक वीज कोसळल्यामुळे दोन म्हशींना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले. सध्या शेतकरी कमी पाण्यावर अधिक उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत असताना निसर्ग मात्र वेळोवेळी शेतकऱ्यांना संकटात टाकतो. हा अनुभव प्रत्येक वर्षी अवकाळी वातावरणात दिसून येतो. त्यामध्ये शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा सध्या जास्त प्रमाणात कल दिसून येत आहे.त्यातून चांगल्या प्रकारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला जातो. परंतु अवकाळी पावसात आसमानी संकट शेतकऱ्यांना धोक्याची घंटा ठरतो. तोच प्रकार पिसोरेखांड येथील नुकसान ग्रस्त अल्पभूधारक शेतकरी साहेबराव आंबू ओहोळ यांच्या बाबतीत घडले. गावचे कामगार तलाठी राजेंद्र भुतकर व गावचे सरपंच विकास इंगळे यांच्यासह काही पंचांनी या घडल्या घटनेचा तात्काळ पंचनामा करून कामगार तलाठी श्री भुतकर यांनी सदर पंचनाम्याचा अहवाल महसूल विभागाकडे सादर केल्याचे समजते. निश्चितच या अवकाळी पावसाने दोन म्हशींचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी अवकाळी पावसात शेती उद्योगाची कामे करताना काळजी घ्यावी; असे आवाहन कृषी व महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :