By : Polticalface Team ,11-08-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :सौ. अनुराधाताई राजेंद्र (दादा) नागवडे विचारमंच आणि श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मुली व महिलांसाठी बेंगलोर येथील आयफोन बनविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीतील रिक्त जागांसाठी आज रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते.
सौ. अनुराधाताई नागवडे यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. तसेच उपस्थित मुलींशी संवाद साधला. दुसऱ्या राज्यात जाणे म्हणजे काही विशेष बाब नाही आपल्यासमोर भारतीय वंशाची कल्पना चावला, सुनिता विल्यम याचे उत्तम उदाहरण आहे. त्या नासामार्फत अंतराळात जाऊ शकतात तर आपण बेंगलोर मध्ये नक्कीच जाऊ शकतो. त्यामुळे पालकांनी याबाबत जागरूक होऊन मुलींना स्वातंत्र्य द्यावे तसेच पालकांच्या या विश्वासाला आपल्याकडून कसल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता मुलींनी घ्यावी. आपल्या पालकांच्या कष्टाची जाण ठेवून आपले आयुष्य यशस्वी करण्यासाठी कार्यरत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उद्घाटन प्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे उपस्थित होते. दादांनी विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसन केले. पुढे बोलताना विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या हेतूने नगर जिल्ह्यातील विविध भागात या मेळाव्या संदर्भात माहिती पोहचविली. यापुढेही अशाच स्वरूपाचे काम अनुराधाताई नागवडे विचारमंच आणि छ्त्रपती कॉलेजच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले. टाटा आणि अंबानी यांनी करिअर ची सुरुवात ही नोकरीच्या माध्यमातून केली परंतु पुढे कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नियोजन करून व्यवसायात यश मिळविले. कंपनीमध्ये सुविधा अनुकूल असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे नमूद केले.
प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख दिली आणि कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला. कंपनीच्या वतीने दशरथ बोरुडे यांनी पहिल्या बॅच मध्ये जे विद्यार्थी जातील त्यांना मोफत बस द्वारे बेंगलोर येथील कंपनीत नेणार असल्याचे नमूद केले. फॉक्सकॉन कंपनीतील सुविधा आणि कामाबद्दलचे सादरीकरण कंपनी अधिकारी संतोष एम. यांनी केले.
एकूण १०० पेक्षा जास्त मुलींनी या मेळाव्यास हजेरी लावली आणि मुलाखतीमध्ये १०० पेक्षा जास्त मुलींची नोकरीसाठी अंतिम निवड झाली. प्रा.शंकर गवते यांनी सूत्रसंचालन केले तसेच प्रा.विलास सुद्रिक यांनी आभार मानले.