विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड
By : Polticalface Team ,04-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे त्यातून विज्ञानाची सांगड घालावी निश्चितपणे जीवनाला दिशा मिळेल असे गौरवोद्गार श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये तीन जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाजार व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे हे होते
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षण संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी दिवं. शिवाजीराव नागवडे बापू यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निरीक्षक श्री लगड पुढे म्हणाले की विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राचार्य व स्टाफचे मोठे योगदान लाभत आहे. ही समाधानाची बाब आहे. विद्यालयाला संरक्षण भिंत आवश्यक असून; त्यासाठी शिक्षक पदवीधर आमदार सत्यजित तांबे व लोणी व्यंकनाथ गावचे भूमिपुत्र आमदार अमित गोरखे या आमदारांच्या निधीतून यासाठी प्रयत्न करू; विद्यालयाच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेचा हेतू देखील प्रामाणिक आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की; संस्थांच्या विद्यालयातील विद्यार्थी हा देशाचा सक्षम नागरिक व्हावा; हीच संस्थेची देखील अपेक्षा आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. यासाठी पालकांनी देखील शिक्षण विभागाकडे आवाज उठवण्याची आवश्यकता आहे असे श्री. लगड यांनी सांगितले.
*प्रास्ताविकात प्राचार्य ए एल पुराणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांना भविष्यात व्यवसायाची निवड करायची असेल तर व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यालयाने आनंदी बाजार भरविला आहे. असे सांगून प्राचार्य पुराने यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासूनचा सर्वांगीण विकास तसेच गुणवत्ता व शाळा अंतर्गत विविध उपक्रमाची माहिती विशद करत; ते पुढे म्हणाले की; विद्यालयाचा संस्थेमध्ये काल आज आणि उद्याही गुणवत्तेबाबत प्रथम क्रमांक राहील; अशी ग्वाही देत विद्यालयात शालेय शिस्ती बरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष केंद्रीत केले जाते. यासाठी स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी व पालकांचेही मौलिक सहकार्य लाभत असल्याचे प्राचार्य पुराने यांनी सांगितले.
* या आयोजित आनंदी बाजारात शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला; विविध फळे; स्वादिष्ट मिठाई; वडापाव; चहा; कॉफी विद्यालयात विक्रीसाठी मोठे आकर्षण ठरले होते. अनेक उपस्थित मान्यवरांनी खरेदीचा देखील आनंद घेतला.
यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ संध्याताई जगताप; स्कूल कमिटीचे सदस्य व मा प्राचार्य बाळासाहेब शेंडे व मधुकर पवार सर आदींनी शुभेच्छा पर भाषणात विद्यालयाच्या विविध उपक्रमाचे कौतुक करत कला क्रीडा व गुणवत्तेत विद्यालय तालुक्यात नवलौकिकास पात्र ठरत आहे. ही निश्चितच गावच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे म्हणाले की; विद्यालयाच्या आयोजनातून आनंदी बाजार भरविला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात निश्चितपणे भर पडणार आहे. शिक्षणाबरोबर खेळातही विद्यार्थ्यांचा सतत सहभाग असतो. त्यामुळे या विद्यालयाचे विद्यार्थी थेट राष्ट्रीय स्तरावरील खेळात पोहोचले असल्याने निश्चितच गावच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे सर पंचायत समितीच्या माजी उपसभापती संध्याताई जगताप माजी संचालक विलासराव काकडे सचिनराव कदम कमिटीचे सदस्य पुरुषोत्तम बापू लगड अकबरभाई इनामदार खंडेराव काकडे संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात मोहनराव नगरे माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे एम आर पवार उमेश साळवे अजित दळवी बाळासाहेब जठार उपस्थित होते तर सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक एस पी इथापे व प्रा निसार शेख यांनी केले.
वाचक क्रमांक :