शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
By : Polticalface Team ,
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्याशिवाय शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई केलीय. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात आपण पुढील संघर्षासाठी सज्ज असल्याचं सांगितलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असं म्हटलंय. इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिलाय. पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय.
शिवसेना ही संघर्षातून तयार झाली असून आतादेखील संघर्षातून ती पुढे जाणार असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते, शिवसैनिकांमध्ये प्रतिक्रिया उमटू लागलीय. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही दिसले. आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे म्हणत शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलंय. त्याशिवाय, इन्स्टाग्रामवर हरीवंशराय बच्चन यांची अग्निपथ ही कविता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह पोस्ट केली आहे
वाचक क्रमांक :