By : Polticalface Team ,02-12-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) जीवनामध्ये पैशापेक्षा प्रत्येकाने मित्रत्वाचे नाते अधिक ऋणानुबंधाचे ठेवावे; संपत्ती हे क्षनिक आहे. तेव्हा प्रत्येकाने एकमेकांच्या संकटात उभे राहावे; तोच खरा आपला मित्र असतो. असे भावनिक उदगार माजी प्राचार्य आर के लगड यांनी आयोजित स्नेह मेळाव्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या एसएससी मार्च 2003- ०4 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य आर के लगड हे होते. या मेळाव्या प्रसंगी वीस वर्षानंतर आपले वर्गमित्र भेटल्याने याप्रसंगी सर्वांनी एकमेकांशी गळा भेट घेत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत यावेळी भावनिक वातावरण तयार झाले होते. याप्रसंगी आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला 21 हजार रुपयाची ग्रंथालयाला पुस्तके व शालेय परिसरात वृक्षरोपण यावेळी केले.
याप्रसंगी माजी विद्यार्थी शिवलिंग क्षीरसागर यांनी यावेळी गुरुर्देव गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा असे म्हणत ज्ञानदान करणारे शिक्षक हेच खरे आपल्या जीवनाला आकार देणारे खरे गुरु आहेत. शालेय जीवनात गुरूंनीच आम्हाला संस्कार विचारांचे उत्तम प्रकारे संस्कार दिल्याने आम्ही आज सक्षम झालो असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे यावेळी म्हणाले की; शालेय जीवनात शिक्षकांकडून बुद्धीला शाळेतून चालना मिळाली; त्या ज्ञान मंदिराला व गुरूला विसरता कामा नये. माजी विद्यार्थ्यांनी आपला शालेय ग्रुप तयार करून शाळेला वेळोवेळी मदत करण्याचे आव्हान केले.
याप्रसंगी गणेश काकडे; प्रा. निसार शेख; गिरे सुनीता खेडेकर; मोहिनी आत्रे; शिक्षक सर्वश्री संजय दळवी; पांडुरंग बोडखे; अरुण रायकर; मधुकर खेडकर; चिखले सर; राणीताई झेंडे; मुख्याध्यापक बाळासाहेब जठार; आदींनी शालेय जीवनातील गुरु शिष्याचे महत्त्व व शिक्षकाची भूमिका किती प्रामाणिक असते याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे यावेळी म्हणाले की; एसएससी मार्च 2003-०४ यावर्षी वर्गशिक्षक म्हणून काम पाहत असताना अगदी प्रामाणिकपणे ज्ञानदान पार पाडले. आणि आता त्याच विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. या बॅचची बारा मुले उच्चशिक्षित होऊन उच्च पदावर नोकरी करतात. अन्य विद्यार्थी विविध क्षेत्रात उद्योजक व व्यावसायिक बनले. त्यातून खरा मनस्वी आनंद लाभला. विद्यार्थ्यांनी मित्रांच्या नात्याला अधिक महत्त्व द्यावे. आमच्या सन्मानापेक्षा आपल्या विद्यालयाकडे अधिक लक्ष द्यावे; असा सल्ला देत श्री पुराने पुढे म्हणाले की; स्थापनेपासून व्यंकनाथ विद्यालयाचा उच्चांकी निकाल; शालेय शिस्त; विविध स्पर्धा त्यातून विद्यार्थ्यांना मिळालेले भरीव मार्गदर्शन त्यामुळे तालुक्यात या विद्यालयाने प्रत्येक उपक्रमात भरारी घेतल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी प्राचार्य पुराणे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास एस एस सी मार्च 2003-० 4 चे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी; शिक्षक तुषार नागवडे; मनोज कांबळे सेवक भाऊसाहेब राऊत; एकनाथ नेटवटे; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; राहुल येरकळ आदी यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन माजी विद्यार्थी सुरेश काकडे यांनी केले. आभार गणेश धाकड यांनी मानले.
वाचक क्रमांक :