ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर(योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रतिनिधी)
By : Polticalface Team ,09-05-2023
शहरातील सलीम अली सरोवर येथे मलजल प्रक्रिया केंद्राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली. अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे अशी मृतांची नावे आहेत. चेंबरमध्ये उतरलेल्या आणखी दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. खाजगी काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.
दरम्यान, चारही मजुरांना गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे यांना मृत घोषित केले. तर दोघांवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच मजुरांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. काही नातेवाईक सिटी चौक पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती आहे.
चौघे उतरले होते चेंबरमध्ये
अंकुश बाबासाहेब थोरात, रावसाहेब सदाशिव घोरपडे, विष्णू उगले आणि बाळू विश्राम खरात (सर्व रा. हिमायतबाग) हे मजूर कामानिमित्त ड्रेनेज चेंबरमध्ये उतरले होते. काही वेळ काम केल्यानंतर अचानक श्वास घेण्यास मजुरांना त्रास होऊ लागला. यातच अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे या दोघांचा मृत्यू झाला. तर विष्णू उगले आणि बाळू खरात याची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाचक क्रमांक :