श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोड लगत असलेल्या अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या मेजर नवनाथ खामकर यांच्या एस मार्ट मॉलला २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग इतकी मोठी होती की मॉलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला असून स्थानिक पातळीवर मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मेजर नवनाथ खामकर यांनी देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतर अत्यल्प भांडवलातून या मॉलची सुरुवात केली होती. आपल्या मेहनतीने व चिकाटीने त्यांनी या व्यवसायाला उंचीवर नेले. अल्पावधीतच एस मार्टने बाजारपेठेत ठसा उमटवला होता. मात्र, अचानक लागलेल्या या आगीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. प्रशासन व अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कोट्यवधींचा माल जळून खाक झाला होता.
या भीषण आगीतून मेजर नवनाथ खामकर यांना मोठा आर्थिक तसेच मानसिक धक्का बसला आहे.
अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आग प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावी कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने या घटनेने श्रीगोंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाचक क्रमांक :