अडीच महिन्यांचे बाळ पाच लाखात विकले; धक्कादायक घटना?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,21-06-2023
छत्रपती संभाजीनगर शहरात अडीच महिन्यांचे बाळ पाच लाखात विकण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. एका महिलेने अडीच महिन्यांचे बाळ शहरातील एका अनाथालयाला विकले. तर अनाथालय चालक दाम्पत्याने त्या बाळाला पाच लाख रुपयांमध्ये विकायला काढले होते. दरम्यान याची महिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा लावून संबधित अनाथालयात छापा टाकत कारवाई केली आहे. तर याप्रकरणी बाळाला विकणारी आई, बाळाचा मामा अमोल मच्छिंद्र वाहुळ, अनाथालय चालक दिलीप श्रीहरी राऊत व त्याची पत्नी सविता यांच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरोसा सेलच्या निरीक्षक आम्रपाली तायडे यांना मंगळवारी सकाळी शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक अनाथालयामध्ये एका बालकाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक अनिता फसाटे, ज्योती गात यांच्यासह सापळ्याचे नियोजन केले. सोबतच जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना याबाबत कळवून सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांचे पथक मदतीला घेतले.
दरम्यान कारवाईसाठी निघालेलं पथक ठीक 15 वाजता अनाथालयामध्ये पोहचले. पोलिसांनी आत जाताच समोर आलेल्या दिलीपला बाजूला केले. तसेच फसाटे व गात यांनी संपूर्ण आश्रमाची पाहणी सुरू केली. दरम्यान याचवेळी एका खोलीत झोळीत बाळ झोपलेले होते. तसेच दिलीपची पत्नी सविता तेथेच बसलेली होती. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली. पोलिसांना उत्तर देतांना, दिलीपने पैठण तालुक्यातील दाभरूळ येथील सुनीता विलास साबळे हिने भावासह येऊन 14 जून रोजी दत्तक देण्यासाठी बाळ आम्हाला दिल्याचा दावा केला. परंतु ते बाळ सुनीताचा असल्याचे कुठलेही पुरावा त्यांच्याकडे मिळून आले नाही.
अनाथालयाकडे बाळ दत्तक देण्याचा परवाना नाही:
दरम्यान पोलिसांकडून चौकशी सुरु असतानाच त्या ठिकाणी बाल दत्तक घेण्यासाठी प्रदीप नंदकिशोर डागा (वय 40, रा. संमेक आर्केड, कॅनॉट प्लेस) हे पत्नीसह आलेले होते. त्यांच्या चौकशीत दिलीप राऊत त्यांना पाच लाख रुपयांमध्ये बाळ देणार होता, असा त्यांनी जवाब दिला आहे. मात्र संबंधित अनाथालयाकडे बाळ दत्तक देण्याचा परवाना नाही. तर याच अनाथालय चालकाविरुद्ध यापूर्वी जवाहरनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
वाचक क्रमांक :