By : Polticalface Team ,07-08-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी नंदकुमार कुरूमकर )--प्रत्येक गावातील विशेषता ग्रामीण भागातील मंदिरे कमी झाले तरी चालतील; परंतु सुसंस्कारित ज्ञानमंदिरे वाढवून त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचा सल्ला जेष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी आयोजित सप्ताह सोहळ्यानिमित्त व्यक्त केला.
श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त जेष्ठ कीर्तनकार ह भ प इंदुरीकर महाराजांचे मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी किर्तन रुपी सेवेत उपस्थित भाविकांना उदबोधित करताना इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की; अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे. त्यामुळे मुलां -मुलींना योग्य संस्कार व ज्ञान मिळवण्यासाठी सुसंस्कारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. असा सल्ला देत इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की; उत्तम प्रकारचे शिक्षण मिळवून देखील आई-वडिलांची मुले -मुली आज्ञा पाळत नाहीत. सज्ञान झाल्यानंतर मुली परस्पर प्रेम विवाह करून असंस्कारित मुलाबरोबर परस्पर विवाह करतात. या चार वर्षात बेभान वागण्यामुळे मुलींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शर्मिने मान खाली घालण्याची वेळ आणून ठेवलेले आहे. हे मोठे आई-वडिलांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचे नुकसान झाल्याचा दावा ह भ प इंदुरीकर महाराजांनी केला आहे.
इंदुरीकर महाराज आणखी पुढे म्हणाले की; संपत्ती तेथे देव निश्चित आहे. परंतु संपत्ती आणि दया कधीही एकत्र येत नाही. त्यातून धार्मिक कार्याचा विसर पडू नये; अशी अपेक्षा व्यक्त करत इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की; जीवनामध्ये इच्छा; स्तुती आणि संसार या तीन गोष्टी वांज आहेत. शर्टाला डाग लागला तरी चालेल परंतु चारित्र्याला डाग लागता कामा नये; हे तत्व मुलींनी आपल्या जीवनात सांभाळावे अन्यथा काळ माफ करणार नाही. असे सांगत इंदुरकर महाराज आणखी पुढे म्हणतात की; या जगात काही विकृत समाजाने छत्रपतींचे रक्तच ठेवले नाही. सर्वकाही विका परंतु स्वाभिमान विकायचा नाही. हे तत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. परंतु त्यांच्याही कार्याचे अनुकरण होत नाही हे दुर्दैवी आहे. या जगात प्रत्येक जण बेभान वक्तांना दिसत आहे. आज प्रत्येक तरुण व्यसनाच्या आहारी जाताना दिसतो आहे. या व्यसनाधीनतेमुळे जन्मदात्या आई-वडिलांना आपल्या मुलाचा डोळ्यादेखत मृत्यू पाहण्याची वेळ ही व्यसनामुळे येऊन ठेपले आहे. त्यामुळे तरुणांचे आयुष्य अत्यंत कमी झाल्याचे दिसते. याचेही तरुण पिढीने अनुकरण व भान ठेवण्याची आवश्यकता आहे. असा सल्ला देखील इंदुरीकर महाराजांनी यावेळी उपस्थित तरुणांना दिला. या सप्ताह सोहळ्यास आमदार बबनराव पाचपुते; काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार; भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांच्यासह तालुक्यातील व लिंपणगाव पंचक्रोशीतील प्रचंड जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना सप्ताहमंडळाने महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते.
ह भ प इंदुरीकर महाराज हे लिंपणगावचे जागृत देवस्थान सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर भाऊक झाले. लिंपणगावचे ग्रामस्थ हे भाग्यवान आहेत. अशा मंदिराचे कोरीव काम हे डोळ्याचे पारणे फेडावे असे आहे. गावच्या या मंदिराची पुरातन कालीन रचना ही हेमाडपंथी व मंदिरातील आकर्षित कोरीव नक्षीकाम पाहून इंदुरीकर महाराज हे भारावून गेले. गावातील ग्रामस्थ व भक्तगण मंदिराचे पावित्र्य व स्वच्छता उत्तम प्रकारे सांभाळतात; देखभाल करत अखंड हरिनाम सप्ताह; ज्ञानेश्वरी पारायण सोहळे यासारखे धार्मिक कार्यक्रम करत आनंदी वातावरण साजरे करतात याबद्दल ग्रामस्थ; भाविक व सप्ताह मंडळाचे इंदुरीकर महाराजांनी कौतुक केले.