By : Polticalface Team ,2025-07-05
लिंपणगाव( प्रतिनिधि ). पाऊले चालती पंढरीची वाट अश्या उक्तीप्रमाणे हजारो भाविक भक्त पंढरपूर कडे रवाना होत आहेत. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देखील सांस्कृतिक वारसा जपावा, संस्कारक्षम पिढी घडावी या उद्देशाने सालाबादप्रमाणे याही वर्षी दिनांक ०५ जुलै रोजी नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल ची बालदिंडी संपन्न झाली.
यावेळी दिंडी नागवडे मिडीयम स्कूल, बगाडे कॉर्नर मार्गे शनी चौक ते महंमद महाराज मंदिर असा प्रवास यावेळी विद्यार्थ्यांनी केला. महंमद महाराज मंदिर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे रिंगण पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल गीतांवरती मनमोहन असे लेझिम लोकनृत्य सादर केले, यावेळी भारुडाच्या माध्यमातून देव एकच असून त्याची रूपे मात्र वेगवेगळी आहेत असा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगोंदा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. प्रभाकर निकम , ह. भ. प. घाडगे महाराज, ह. भ. प. लाटे महाराज, ह. भ. प. वाळूज महाराज, श्री. जयदत्त साळुंखे, श्री. रामदास वाळके उपस्थित होते.
यावेळी बोलताना ह. भ. प. घाडगे महाराज म्हणाले हिंदू मुस्लिम ऐक्य ची शिकवण देणारे संत श्री महंमद महाराज प्रांगणात स्व. बापूनी सुरू केलेला बालदिंडी सोहळा हा २५ वर्ष या विद्यार्थ्यांनी सुरू ठेवला ही अभिमानाची बाब आहे.
संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य नागवडे इंग्लिश मिडीयम करत आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. प्रभाकर निकम यांनी केले.
याप्रसंगी त्रिमूर्ती भेळ चे सर्वेसर्वा उद्योजक श्री. चंद्रकांत चौधरी यांनी बाळवारकऱ्यांना अल्पोहार दिला. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने शाळेस गौरवशाली परंपरा जपणे व शिस्तबद्ध पद्धतीने दिंडीचे आयोजन केल्याबद्दल गौरवण्यात आले.
हा बालदिंडी कार्यक्रम तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे,निरीक्षक एस.पी. गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्ष अविरतपणे सुरू आहे.
यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक,परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.