By : Polticalface Team ,2025-07-30
श्रीगोंदा: तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संविधान दीपक म्हस्के याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतर मुलांप्रमाणे केक कापणे, फुगे फोडणे, पार्टी करणे हे करण्याऐवजी संविधान याने "केक खरेदीसाठी होणारा खर्च वाचवून", शाळेसाठी "पृथ्वी" (Earth Globe) भेट दिली.
शालेय जीवनातच मुलांनी सामाजिक जाणीव ठेवावी, पर्यावरण व शिक्षणाविषयी आदर वाटावा, यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. आजच्या डिजिटल युगात मुलांना भौगोलिक शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून समजावे म्हणून संविधानने दिलेली ही भेट अत्यंत उपयोगी ठरणार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने ही पृथ्वी म्हणजे एक अमूल्य साधन आहे.
संविधान याचे वडील दीपक मच्छिंद्र म्हस्के व चुलते प्रकाश मच्छिंद्र म्हस्के यांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. या दोघांच्या मार्गदर्शनामुळेच संविधानने असा विचार प्रत्यक्षात उतरवला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय लंके सर, वैशाली परिहार मॅडम, दिगांबळ भुजबळ सर, रंजना सोनवणे मॅडम, दिलीप रासकर सर, दीपाली कणसे मॅडम, आणि राजू रसाळ सर यांची उपस्थिती लाभली.
शाळेच्या परिसरात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून संविधानने पृथ्वी शाळेला प्रदान केली. यावेळी उपस्थित शिक्षकांनीही संविधानच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. पृथ्वी केवळ एक वस्तू नसून, तिच्या माध्यमातून संविधानने शिक्षण, पर्यावरण, आणि सामाजिक जबाबदारी यांचा उत्तम संगम साधला आहे.
संविधानने दिलेली पृथ्वी शाळेच्या टेबलवर ठेवण्यात आली असून त्याच्या देखभालीची जबाबदारी स्वतः संविधानने घेतली आहे. आजच्या पिढीने समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक विचार अंगीकारावा, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
हा उपक्रम संपूर्ण गावासाठी व शाळेसाठी अभिमानास्पद असून, समाजात सकारात्मक संदेश देतो की लहान वयातही मोठ्या विचारांची आणि कृतीची बीजं रुजवता येतात. संविधानच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो आदर्श ठरत आहे.
वाचक क्रमांक :