By : Polticalface Team ,2024-12-15
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १५ डिसेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे पडवी ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री क्षेत्र माळवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक १४/१२/२०२४ रोजी प.पू.सद्गुरु श्री आण्णा महाराज रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दत्तजयंती निमित्त श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्यात आला होता. या पारायण सोहळ्यात विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. शनिवार सकाळी ७.वा.श्री दत्त महाराज यांची आरती करण्यात आली, स.७ ते ९ गुरुचरित्र पारायण समाप्ती व श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. तर स. ९ ते ११ दत्त जयंती निमित्त अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ११ ते १ वाजे पर्यंत श्री दत्तयाग व होमहवन चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी २ ते ४ वाजे पर्यंत पडवी माळवाडी या पंचक्रोशीतून आलेले सांप्रदायिक भजनी मंडळी यांनी हरिभजनाचा कार्यक्रम साजरा केला. दुपारी ४ ते ६ वाजे पर्यंत हे.भ.प.प्रा.नवनाथ महाराज माशेरे यांचा वारकरी सांप्रदायिक किर्तनाचा कार्यक्रम झाला.
या वेळी सर्व भाविक भक्तांनी राम कृष्ण हरी म्हणत किर्तनाचा आनंद घेतला. सायं .६.०३ मि.श्री दत्त जन्म सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. सायं ७.वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मानवी जीवनात गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे या किर्तनाच्या माध्यमातून बोलताना माशेरे महाराज यांनी पटवून सांगितले. आई वडिलांची आणि गुरुंची सेवा केल्यास देव सुद्धा भक्तांच्या हाकेला धावून येतो. संतांची या संगती मनोमार्गी गती अकळावा श्रीपती येणे पंथे अशी उदाहरणे देऊन बोलताना सांगितले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि नियोजन श्री दत्त औदुंबर सेवा संस्था व श्री दत्त सेवेकरी मंडळाच्या वतीने व्यवस्थीतरित्या पार पाडले श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे विविध भागातून आलेल्या भाविकांनी श्री दत्त महाराज व सद्गुरू श्री आण्णा महाराज यांचे मनोभावे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. या प्रसंगी अनेक भाविकांनी मोठी संख्येने उपस्थिती दर्शविली होती.