आगळगाव मध्ये शाळेचा स्लॅब कोसळला, विद्यार्थी थोडक्यात बचावले
By : Polticalface Team ,Sat Jul 16 2022 18:03:24 GMT+0530 (India Standard Time)
सोलापूर : जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना जिल्ह्यातील बार्शीच्या आगळगावात घडली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने शाळेच्या वर्ग खोल्या भिजल्या. त्यानंतर शाळेचा स्लॅब कोसळला. मात्र सुदैवाने दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी वर्गाबाहेर गेल्यानंतर हा प्रकार घडला.
त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आगळगावात २५ ते ३० वर्ष जुने बांधकाम असणारी जिल्हा परिषदेची शाळा आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, सलग पाच दिवस बरसणाऱ्या संततधार पावसामुळे शाळांची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद चिमुकल्या शाळकरी जीवांचा विचार करून या धोकादायक शाळांबाबत काही ठोस निर्णय घेते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
वाचक क्रमांक :