By : Polticalface Team ,Fri Sep 23 2022 18:05:07 GMT+0530 (India Standard Time)
2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला न्यायालयाने दिली आहे. न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्याने शिवसेनेमध्ये आनंदाचं वातावरण आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय मानला जात आहे.
यावेळी उद्धव ठाकरे गटाचे वकिल, एकनाथ शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे वकिल तर महापालिकेचे वकिल अशा तीनही बाजूंनी जोरदार युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. त्यानंतर सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी दिली. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद काय? शिवसेनेच्यावतीने आस्पी चिनॉय यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना काही सवाल उपस्थित केले. त्यामध्ये दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं ही त्यांची परंपरा असून राज्य सरकारने 2016 मध्ये काढलेल्या अद्यादेशामध्ये आम्हाला दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिलेली आहे. मात्र कोरोनामुळे दोन वर्ष मेळावा झाला नव्हता. तर सरवणकर यांच्या याचिकेत आम्हाला विरोध करण्याऐवजी त्यांनी स्वत:साठी मागणी केलीय? मात्र असं कसं होऊ शकतं? या अर्जातच विसंगती असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे गटाचे वकील आस्पी चिनॉय यांनी न्यायालयात केला. सदा सरवणकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद काय? आम्ही दुसऱ्या पक्षाकडून अर्ज केलेला नाही. आम्ही सत्तेत आहोत. सदा सरवणकर यांच्या अर्जाला अर्थ नाही असं कसं म्हणता येईल. मात्र आमची याचिका समोरच्या याचिकाकर्त्यांना समजून सांगणं महत्वाचं. पक्षासाठी अर्ज करण्याचा सदा सरवणकर यांना पूर्ण अधीकार असल्याचं सरवणकर यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. महापालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद काय? दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील वादानंतर महापालिकेने परवानगी का नाकारली. याबाबत महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. दसरा मेळाव्यावर आलेल्या परवानगीच्या अर्जावर आम्ही मैदान न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयात दिले. त्याचबरोबर मैदानाची परवानगी नाकारल्याने कोणाच्या अधिकाराचं उल्लंघन होत नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. तर यानंतर बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाला पारवानगी कशी मिळाली? असा सवाल सदा सरवणकर यांच्या वकिलांना न्यायालयाने विचारला. वाचक क्रमांक :