अतिवृष्टी झालेल्या पिक नुकसानी बाबत त्वरित भरपाई मिळावी - माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी
By : Polticalface Team ,Fri Oct 14 2022 18:10:42 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी
करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानी बाबत भरपाई मिळावी म्हणून आता माजी आमदार नारायण पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन सादर केले. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावांना अविरत होत असलेल्या पावसाचा व अतिवृष्टीचा फटका बसला असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावातील पिके तर सोडाच पण शेतीही वाहुन गेल्याने शेतकऱ्यांचे भविष्य सुद्धा धोक्यात आले आहे.बांध व शेतातील गाळपेरीची सकस माती वाहून गेल्याने आता आगामी पाच दहा वर्षांत सुद्धा शेती पुर्ववत करणे सरद शेतकऱ्याला अशक्य आहे. अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. केळी सारख्या जीवापाड जोपासललेल्या व कर्ज काढून पिके वाढण्यास खर्च केलेल्या बागांचेही आता अतिवृष्टी मुळे नुकसान झाले. तसेच शेती शिवाय भाजीपाला व फलोत्पादन व्यावसाय सुद्धा धोक्यात आला आहे. शेती नुकसानी शिवाय घरांची झालेली पडझड व वाहून गेलेले रस्ते आणि छोटे पुल यांचेही नुकसान झाले आहे. याचा दळणवळण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी विद्युत पोल व तारा पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. आपण ही सर्व परिस्थिती गंभीरतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समोर तपशीलवार माहिती नुसार मांडली आहे.यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागास करमाळा मतदार संघातील अतिवृष्टी नुकसानीची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मग शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी आपली अपेक्षा असून लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांतील फटका बसलेल्या पिके, घरे, फळबागा, रस्ते आदिंचे तात्काळ पंचनामे होऊन योगा ती नुकसान भरपाई मिळेल यासाठी आपण आशावादी असल्याचेही माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तसेच याबाबतचा आपला पाठपुरावा चालूच राहणार असून यापूर्वी आपण जिल्हाधिकारी यांचीही भेट घेऊन त्यांना परिस्थिती बाबत सांगितले असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.
वाचक क्रमांक :