विकासाची आकांक्षा बाळगणाऱ्या आकांक्षीत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साधणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
By : Polticalface Team ,Wed Oct 19 2022 08:20:24 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई दि.18 -देशातील मागास ठरलेल्या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 112 जिल्ह्यांची निवड केली असून या जिल्ह्यांच्या विकासासाठी आकांक्षीत जिल्हा विकास उपक्रम भारत सरकार ने सुरू केला असून त्या अंतर्गत दिलेल्या विशेष निधीतुन झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणारी बैठक जिल्हा अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.या बैठकीला स्थानिक खासदार अशोक नेते; गडचीरोली चे जिल्हाधिकारी संजय मीना तसेच सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वात गडचिरोली आणि देशभरातील 112 आकांक्षीत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. आकांक्षीत जिल्ह्या विकास उपक्रमात महाराष्ट्रातील गडचिरोली;पंजाब मधील मोघा आणि फिरोजाबाद आणि उत्तराखंड मधील पंतनगर या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर ना.रामदास आठवले असून त्याची सुरुवात आज गडचिरोली चा दौरा करून ना.रामदास आठवले यांनी केली.
देशभरातील 112 जिल्हे विकासासाठी आकांक्षीत जिल्हे म्हणून जाहीर झाले असून त्यातील क्रमवारीत गडचिरोलीचा 60 वा क्रमांक लागतो. गडचिरोली ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गडचिरोली च्या विकासासाठी महत्वाकांक्षी जिल्हा उपक्रमात 9 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.त्या निधीतून 3 कोटी शिक्षणासाठी आणि 3 कोटी आर्थिक सहाय्य बँकिंग आदी आणि 3 कोटी सर्वांगीण विकासाच्या विविध कामांना खर्च करण्यात आले. त्या कामांचा आढावा ना.रामदास आठवले यांनी आज घेतला.
गडचिरोली येथील वेदांती नशामुक्ती आणि पुनर्वसन केंद्रा ला ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. नशामुक्ती साठी दाखल लोकांशी त्यांनी संवाद साधला. या केंद्रात 15 बेड असून त्यांना भारत सरकार तर्फे वार्षिक 22 लाख अनुदान मिळत आहे. येथे येऊन अनेकांनी दारूचे व्यसन सोडले असून ते आता चांगल्या जीवनमार्गाने जगत आहेत. व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन देण्याचे काम नशामुक्ती केंद्र करीत आहे. भारत सरकार च्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे नशामुक्ती केंद्राचा उपक्रम देशभर सुरू आहे.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. येथे जंगल विपुल प्रमाणात आहे.मात्र इथे उद्योग नाहीत. येथील वन विभागाच्या खुरटी वनस्पती उगवणाऱ्या जमिनी येथील गरीब भूमिहीनांना शेती करण्यासाठी द्याव्यात. तसेच या भागात दुग्ध व्यवसाय अत्यल्प असून डेअरी प्रोजेक्ट चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो त्या दृष्टीने पावले उचलण्याची सूचना ना.रामदास आठवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
गडचिरोलीत 60 हजार सिकलसेल चे रुग्ण असून सिकलसेल च्या रुग्णांचा भारत सरकार ने आता दिव्यांगांमध्ये समावेश केला आहे. अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली.
गडचिरोली मध्ये एकल ग्राम सभा हा उत्कृष्ट उपक्रम जिल्हाधिकारी मीना यांनी कल्पक बुद्धीने सुरू केला आहे. तसेच दिशा आणि फुलोरा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये हायजीन आरोग्य जागृती साठी महत्वाचा ठरला आहे .आशा विविध उपक्रमांचा विकासकामांचा ना.रामदास आठवले यांनी आढावा घेतला. दुर्गम भागात विकासाचे उपक्रम राबविले जात आहेत. भारत सरकार च्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या माणसा पर्यंत पोहोचावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीत केले.
गडचिरोली मधील डॉ आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी मागणी येथील जनतेने केली आहे. त्याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ मोठी असून त्यांचा त्याग मोठा आहे.मात्र नक्षलवाद्यानी आदिवासींच्या विकासासाठी लोकशाहीच्या मुख्यप्रवाहात आले पाहिजे.हिंसेचा मार्ग सोडून अहिंसा युद्ध सोडून बुद्ध स्वीकारला पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
वाचक क्रमांक :