पिकाचे पंचनामे करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
By : Polticalface Team ,Mon Oct 31 2022 15:15:50 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर : नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे उघडकीस आला आहे. पिकाचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार समोर आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
या धक्कादायक प्रकारानंतर शेतावर पंचनामा करणाऱ्या संबंधित पथकासह तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पंचनामे करण्यासाठी थेट पैशाची मागणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली आहे का नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी चारशे रुपये घेतले जात असल्याचा प्रकार नेवाशात समोर आला. नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोबाईलमध्ये चित्रिकरण करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर थेट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधितावर निलंबनाची कारवाई केली आहे
वाचक क्रमांक :