पंकजा मुंडेंचा 10 वर्षांचा गड कोसळला, निवडणुकीत धनंजय मुंडेंचा विजय
By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 14:29:40 GMT+0530 (India Standard Time)
बीड : बीडमधील नुकत्याच झालेल्या एका निवडणुकीतही पंकजा मुंडेंच्या गटाला धनंजय मुंडे गटाने चांगलीच धुळ चारली आहे. परळीच्या पांगरी येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
तब्बल 10 वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व पहावयास मिळाले आहे. पांगरी येथेच गोपीनाथ गड आहे. त्यामुळे मुंडे भावंडांची ही लढाई वर्चस्वाची ठरते. आणि याच गावातून धनंजय मुंडे यांच्या गटाने दणदणीत विजय मिळविल्याने पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पांगरी सोसायटी धनंजय मुंडेंच्या ताब्यात गेल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का समजला जातोय. दरम्यान निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटाने मोठा जल्लोष केला आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पांगरी सोसायटीवर वर्चस्व होते. मात्र त्यांच्या निधनानंतर पांगरीच्या ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांना मोठी साथ देत सेवा सहकारी सोसायटी ताब्यात दिली.
यंदा, मात्र या निवडणुकीत मुंडे बहीण भावात चुरशीची लढाई पहावयास मिळाली. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने धनंजय मुंडे विजयी झाले. त्यानंतर मात्र परळी मतदार संघातील अनेक लहान मोठ्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे जातीने लक्ष देत विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरूवात केली.
त्याचेच फलित म्हणून पांगरी सेवा सहकारी सोसायटीकडे पाहिले जातेय. 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच या सोसायटीवर राष्ट्रवादी म्हणजेच धनंजय मुंडे यांनी एकहाती वर्चस्व मिळविले आहे
वाचक क्रमांक :