छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान! औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात बंदची हाक
By : Polticalface Team ,22-11-2022
औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या विरोधात राज्यभरात मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून बंदची हाक देण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या बंदची हाक दिली आहे.
एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्रिवेदी म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. यानंतर त्रिवेदी यांच्या या विधानाने राज्यभरात संताप पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहे. तर विरोधकांकडून देखील भाजपवर टीका केली जाते. अशातच त्रिवेदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपला मस्ती चढली आहे. त्यामुळे यांचा निषेध म्हणून आज सर्वांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला पाहिजे. सत्ता आल्यावर वाटेल ते बोलणाऱ्या भाजपला कळू द्या अजून ते एवढे मोठे झाले नाही. त्यामुळे आज बंद म्हणजे बंद... महाराष्ट्र बंद असेही जाधव यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे आज कन्नड शहरात बहुतांश ठिकाणी दुकाने बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे
वाचक क्रमांक :