By : Polticalface Team ,06-12-2022
सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला होता. एस. एम. जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचे नियोजन केले होते. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असे ठरविले. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.
पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होते. बेळगावात दाखल होण्यासाठी शरद पवार यांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. त्यांच्यासोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. पवारांनी खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. ते स्वतः गाडी चालवत होते. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली. परंतु त्यांना काहीच कळलं नाही. पवार बेळगावात पोहचले. पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.
बेळगावात जमावबंदी होती. पवार पूर्वीच बेळगावात पोहोचले. अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शरद पवार, बाबासाहेब कुपेकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेदम मारहाण केली.
पवार, कुपेकर यांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आले. तेथेही लोक जमा झाले होते. एस.एम. जोशी हे पवारांना भेटायला गेले. त्यांनी पवारांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते, असे सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय, अशी टीकाही सुळे यांनी सध्याच्या सरकारवर केली आहे. वाचक क्रमांक :