रमजानुल मुबारक - ६
*भावनांची जाणीव होण्याचा काळ*
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
९२२६४०८०८२
रमजान महिन्यात केले जाणारे प्रत्येक कार्य हे एकीकडे पुण्य प्राप्तीचा आनंद देत असतांना दुसरीकडे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देखील देत असते. उदार अंत:करणाने लोक रमजान महिन्यामध्ये दानधर्म करतात.वस्तू वाटप करतात.गरजूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होतो.यातूनच मानवतेच्या मूल्यांची जोपासना होते. रमजानचा रोजा धरल्याने तहान,भूक याची जाणीव व्यक्तीच्या ठायी निर्माण होते.जिथे पाणी मिळत नसेल तेथील लोकांची तहान कशी भागत असेल याची कल्पना रोज्यामुळे निर्माण होते.ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही ते आपली भूक कशा पद्धतीने भागवत असतील याची जाणीव भूक लागल्यावर होते.त्याचबरोबर सुदृढ शरीरासाठी उपवास करणे अर्थात भुकेले राहणे सुद्धा आवश्यक आहे ही बाब सुद्धा प्रकर्षाने आपल्या निदर्शनास येते.
हजरत पैगंबर यांनी म्हटले आहे कि पोटभर खाऊ नका.शरीराचा एक तृतीयांश भाग अन्न, एक तृतीयांश भाग पाणी आणि एक तृतीयांश भाग रिकामा ठेवावा. तुम्ही कधी ही आजारी पडणार नाहीत.
इस्लाम धर्माने एकमेकांच्या भावना जाणून घेण्याला खूप महत्त्व दिले आहे.जेव्हा आपण रोजा धरतो, त्यातून भुकेची जाणीव निर्माण होते आणि ज्यांच्या घरात कधी कधी खायला काही नसतं असे लोक आपली गुजराण कशा पद्धतीने करत असतील याची जाणीव या रोज्यामुळे निर्माण होते.अशा घटकांची मदत करण्याची भावना व्यक्तीमध्ये वाढीस लागते. हाच रोजाचा महत्त्वाचा उद्देश आहे. गरजूंना मदत केल्याने त्यांच्या गरजा पूर्ण होतात. आपल्याला देखील एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते.आपल्या उत्पन्नावर फक्त आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा हक्क नाही तर,समाजातील असे गोरगरीब,गरजू लोक, मुके प्राणी,पक्षी यांचा देखील हक्क आहे आणि तो आपण आदा केला पाहिजे ही प्रामुख्याने इस्लाम धर्माची शिकवण आहे.तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्नदान केले पाहिजे.ही प्रथा जगामध्ये पूर्वीपासूनच आहे.तिचा स्वीकार करून आपणही आपल्या परीने शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न अशा घटकांना केला पाहिजे. ही जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम रमजान महिन्यात होत असते.म्हणून हा महिना गमख्वारी अर्थात दु:ख वाटून घेउन मदत करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो.(क्रमशः)
**********************
वाचक क्रमांक :