By : Polticalface Team ,02-02-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी )ज्यांना ग्रामपंचायतीमध्ये निवडून येता येत नाही. व त्यांच्या वयाइतके जीवन राजकारण आणि समाजकारणात व्यतीत करणाऱ्या नेत्यांच्या कामाबद्दल अज्ञानीपणे बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रताप पाचपुते यांना गेल्या पाच वर्षात वांगदरी गांवच्या समस्या दिसल्या नाहीत व आता निवडणुक तोंडावर आल्यानंतर वागदरीबद्दल पुतना मावशीचे प्रेम निर्माण झाले असल्याची टिका वांगदरीचे सरपंच संजयकाका नागवडे यांनी केली. वांगदरी गावच्या घरकुल योजनेसंदर्भात व ढोकराई इनामगांव रस्त्याकरीता मंजूर झालेल्या निधीबाबत प्रताप पाचपुते यांनी केलेल्या टिपणीबद्दल वांगदरीचे सरपंच संजयकाका नागवडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्वर्गीय शिवाजीराव नागवडे व राजेंद्रदादा नागवडे यांच्या कार्यकर्तृत्वामुळे वांगदरी गांव हे जिल्ह्याच्या व राज्याच्या नकाशावर आले. सन २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राजेंद्रदादा नागवडे यांच्या आदेशानुसार सर्व नागवडे समर्थकांनी बबनराव पाचपुते यांना मदत केली., त्यामुळे ते आमदार झाले. परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळात त्यांना वांगदरीचा रस्ता दिसल नाही किंवा इतर समस्या दिसल्या नाहीत. नागवडे यांच्या मदतीमुळे आपण आमदार झालो याची जाणीव त्यांना राहिली नाही. ढोकराई ते इनामगांव या रस्त्याचे डांबरीकरण स्व. शिवाजीराव नागवडे हे आमदार असताना सन २००२-०३ मध्ये झालेले आहे. त्यानंतर गेल्या २० वर्षात पाचपुतेंनी या रस्ता दुरुस्तीसाठी काय केले हा चिंतनाचा विषय आहे. वांगदरीच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात रस्त्यांची वाताहत झालेली आहे. पेपरला फक्त जाहीराती व बातम्या पहायला मिळतात परंतु रस्ता झालेला कुठेच दिसत नाही लोकांना प्रवास नको वाटतोय ही वस्तुस्थिती आहे.
राजेंद्रदादा नागवडे व सौ अनुराधा नागवडे यांनी केंद्रीय रस्ते वहातुक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे समक्ष भेटून पाठपुरावा केला. मग पाचपुतेंना जाग आली व रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याच्या घोषणा करु लागले. इनामगांव वांगदरी- श्रीगोंदा फॅक्टरी-लिंगणगांव असा असणारा राज्यमार्ग सत्तेच्या माध्यमातून काष्टीमार्गे वळविला यावरुन वांगदरी गावावर पाचपुते यांचे किती प्रेम आहे हे सर्व जनता ओळखून आहे. नागवडे यांचा पाठपुरावा पाहून पाचपुते यांनी पत्र दिले म्हणजे लगेच काम झाले असे नाही.
काही योजना व केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या असतात. त्यांना आमदार निधी किंवा खासदार निधी मिळत नाही. त्या योजना ग्रामपंचातीचे जाणीवपुर्वक पाठपुरावा करुन राबवायच्या असतात तेंव्हाच त्या यशस्वी होतात. शासकिय नियमानुसार त्या पुर्ण करुन घ्यायच्या असता. त्यामध्ये आमदार खासदार यांचे वैयक्तीक योगदान काही नसते त्या योजना प्रत्येक गावासाठी शासनाने धोरणात्मकरित्या तयार केलेल्या असतात. त्या वांगदरी ग्रामपंचायतीने राबविलेल्या आहेत.
वांगदरी गावामध्ये उभ्या राहिलेल्या पथदर्शी घरकुल योजना ही केंद्र सरकारच्या योजनेतून राबविलेली आहे. त्या घरकुल योजनेस केंद्र सरकारचे सहाय्य मिळाले ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याकरीता ग्रामपंचायतीने तेवढाच निधी अन्य मार्गाने उपलब्ध केलेला आहे. व त्याकरीता माजी सरपंच आदेश नागवडे व आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजेंद्रदादा नागवडे व सौ. अनुराधा नागवडे यांचे मार्गदर्शनाखाली मोठे परिश्रम घेतलेले आहेत म्हणुन सदरची घरकुल योजना अतिशय उत्तम दर्जाची उभी राहिलेली आहे. या योजनेकरीता राजेंद्रदादा नागवडे यांनी दिलेले योगदान प्रताप पाचपुते यांना माहिती नाही. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी टिका करु नये ,असे आवाहन सरपंच संजयकाका नागवडे यांनी केले आहे.