By : Polticalface Team ,07-03-2024
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले मात्र अद्यापही महाविकास आघाडीचे जागावाटप गुलदस्त्यात असल्याचं यावेळी दिसून आलं.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासह वंचितचे प्रकाश आंबेडकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते. तब्बल चार तास ही बैठक चालली. या बैठकीत जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र अद्याप देखील जागावाटपावर स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तसेच 9 मार्चला पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितल की, महाविकास आघाडीचे आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. यावेळी लोकसभेच्या सर्व 48 जागांवरती सकारात्मक आणि उत्तम चर्चा झाली. त्यामुळे चारही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत.
प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रस्ताव या बैठकीत मांडला. त्यावर देखील चर्चा झाली. आमच्या सर्वांची भूमिका आहे की, महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांसोबत प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी देखील असावी. मात्र यावेळी जागा वाटपाबाबत कोणतीही माहिती संजय राऊत त्यांनी दिली नाही. त्यांनी सांगितले की सर्व पक्ष एकत्र येऊन आम्ही जागा वाटपाबाबत घोषणा करू. तसेच प्रकाश आंबेडकर यांचं त्या गोष्टीवर एकमत झालं आहे. महाराष्ट्रातून भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणतेही मतभेद नसून, सगळ काही ठरलं आहे. असं राऊत म्हणाले.
तर यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. तसेच सर्व पक्षांची सकारात्मक चर्चा झाली. असे सांगितलं मात्र यावेळी त्यांनी देखील जागा वाटपाबाबत स्पष्ट बोलणं टाळलं. तसेच या बैठकीबाबत प्रकाश आंबेडकर यांना माध्यमांना प्रश्न विचारला असता त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत पुढच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगितलं. तर आंबेडकर यांनी जवळपास 17 जागांवरील चर्चा केली त्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरांनी काही जागांवर अदलाबदली करा. अशी भूमिका व्यक्त केली आहे. अशी माहिती समोर येत आहे.