घोड डाव्या कालव्याचे आवर्तन ०१ जानेवारी पासून सुरु - आ.बबनराव पाचपुते
By : Polticalface Team ,Mon Dec 27 2021 18:28:06 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी:- घोड डावा कालवा लाभक्षेत्रामध्ये सध्या पाण्याची नितांत आवश्यकता असून घोड लाभक्षेत्रा खालील शेतकऱ्यांची चालू पिकांसाठी पाणी लवकरात लवकर मिळावे अशी मागणी होती. त्यानुसार शनिवार दि. ०४-१२-२०२१ रोजी दुपारी ०३.३० वा. मा. मंत्री, जलसंपदा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये घोड डाव्या कालव्याचे आवर्तन दि. १० जानेवारी २०२२ पासुन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सद्यस्थिती मध्ये लाभधारक शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्याची तीव्र मागणी होत होती.
त्यामुळे लाभधारक शेतकर्यांना त्यांच्या शेतीसाठी त्यांचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी आमदार अशोकबापू पवार व आमदार रोहितदादा पवार यांच्याशी चर्चा करून अधिक्षक अभियंता,(कुकडी व घोड प्रकल्प), पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सुचविले. घोड डाव्या कालवा आवर्तनाबाबत आ. अशोकबापू पवार व आ. रोहितदादा पवार यांच्याशी झालेल्या सकरात्मक चर्चेतून अधिक्षक अभियंता, पुणे यांच्याशी चर्चा करून शनिवार दि.०१-०१-२०२२ पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, घोड डावा लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्याना न्याय देण्याचे काम नेहमीच करत आलो व करत राहिल अशी माहिती आ. बबनराव पाचपुते यांनी वार्ताहराशी बोलताना दिली.
वाचक क्रमांक :