नववर्षाचे स्वागत वृक्षलागवड आणि फुलझाडे लावून करू या - सुधाकर यादव
By : Polticalface Team ,Wed Dec 29 2021 09:38:56 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा एक स्तुत्य उपक्रम
आष्टी : दि.२८ (प्रतिनिधी) पंचायत समिती आष्टी च्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आष्टी तालुक्यातील सर्व शिक्षकांना कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी आवाहन केले आहे की,तालुक्यातील शिक्षकांनी आपल्या शाळेचा परिसर सुंदर आणि सजावट केलेला दिसून यावा.याकरिता शालेय परिसरात फुलांच्या वेली,फुलांचे वृक्ष,वनौषधी वृक्ष आणि फळे देणारी वृक्ष तसेच उष्ण कालावधीमध्ये सावली देणारी वृक्ष लावावीत व नववर्षचे उत्साहात स्वागत करावे.
यासाठी प्राधान्यक्रमाने आपल्या शाळेच्या परिसरात खूप वाढणारी वृक्ष यांचे रोपण करावे.याकरिता दिनांक २९ डिसेंबर २०२१ पासून दिनांक ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यासाठी जागेची निवड करावी.तसेच वृक्षांसाठी खड्डे खोदून तयार ठेवावेत.वृक्षांची निवड करावी,लागवडीसाठी वृक्षांची उपलब्धता करावी.
याकामी आपल्या शाळेतील मनुष्यबळ जसे की विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून आणि सक्रिय सहभागातून तसेच श्रमदानातून हे कार्य करावे.दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी आपल्या गावातील मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती,शिक्षणप्रेमी नागरिक,माजी विद्यार्थी यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करावी.सदरील कार्यक्रमाचे निवडक फोटो घेऊन गटशिक्षण कार्यालयास सादर करावेत.तसेच सदरील फोटो आपल्या शाळेने संग्रही ठेवावेत.नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने आपल्या शाळेचा परिसर आकर्षक सुंदर आणि पर्यावरण पूरक करण्याचा प्रयास करावा.ज्या शाळांना स्वतःचे प्रांगण नाही त्यांनी किमान कुंड्यांमधून शोभेची रोपटी लावावीत असेही शेवटी गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी आवाहन केले आहे.त्यांच्या या आगळ्या - वेगळ्या पर्यावरण पूरक उपक्रमाचे आष्टी तालुक्यातील शिक्षकांनी स्वागत केले आहे.
वाचक क्रमांक :