दिव्य मराठी चा अंदाज ठरला खरा ! कुकडीत राहुल जगताप यांचा पॅनल बिनविरोध; पाचपुते गटाचा काढता पाय!
By : Polticalface Team ,Tue Jan 04 2022 09:39:31 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदे :- कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. यात बबनराव पाचपुते गटाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने राहुल जगताप गटाच्या उमेदवारांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीत विरोधी गटात सक्षम उमेदवार नसल्याने सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं माजी आमदार राहुल जगताप अखेर कुकडीत बिग बॉस ठरले
गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदे तालुक्यात सहकारी कारखान्याच्या निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. एकीकडे नागवडे कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आरोप प्रत्यारोपांनी गाजत आहे तर दुसरीकडे कुकडी मध्ये मात्र राहुल जगताप यांनी आपणच बॉस असल्याचे सिद्ध करून दाखवले.
जि. प. सदस्य दिनकर पंधरकर यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपुते गटाने निवडणूकीचे रणशिंग फुंकले होते. पाचपुते यांचे पुतणे साजन यांचा चेहरा या निवडणुकीसाठी आ.पाचपुते यांनी अप्रत्यक्षपणे पुढे केला होता. त्यामुळे आता निवडणुकीत रंगत येते की काय असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, माजी आमदार राहुल जगताप यांच्यापुढे आपला निभाव लागणे शक्य नाही हे लक्षात येताच दिनकर पंधरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीतून अर्ज माघारी घेत, २१ जागेवर जगताप यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी एकप्रकारे हिरवा कंदील दाखवला.
यापूर्वीच सेवा संस्थांच्या जागेवरून डॉ. प्रनोती जगताप या बिनविरोध निवडुन आल्या होत्या. त्यांच्या पायगुणाने आता अख्खा कारखानाच बिनविरोध झाल्याची प्रतिक्रिया जगताप समर्थकांनी यावेळी दिली. इथून पुढे कदाचित राहुल जगताप यांना तालुक्याच्या राजकारणात वेळ देता यावा यासाठी प्रनोती यांनाच कारखान्याचे चेअरमन केले जाण्याची शक्यता आहे.
चौकट :- विधानसभा निवडणुकीतुन अचानक माघार घेतल्या नंतर राहुल जगताप गट काहीसा शांत झाला होता. या विजयाने मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधाण आले. आता इथून पुढे हेच वारे कायम राहून विधानसभा २०२४ ला विरोधकांना चारिमुंडया चित करू अशी प्रतिक्रिया राहुल जगताप यांनी दिली.
वाचक क्रमांक :