By : Polticalface Team ,13-02-2025
बेळगाव आणि कर्नाटकातील लाखो मराठी भाषिकांना दर्जेदार मराठी चित्रपट पाहता यावेत, यासाठी लवेरिया हा सिनेमा १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी धाकल पाटील या YouTube चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
बेळगावच्या निर्मात्याचा अनोखा निर्णय
बेळगावमध्ये लाखोंच्या संख्येने मराठी लोक राहत असले तरी, तिथल्या थिएटरमध्ये अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. यामुळे प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पर्याय निवडला असल्याचे निर्माते निलेश पाटील यांनी सांगितले.
तगडी स्टारकास्ट आणि दर्जेदार संगीत
लवेरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन भिमराज गायकवाड यांनी केले असून, छायांकनाची जबाबदारी किरण मोरे यांनी सांभाळली आहे.
चित्रपटात अजय वरपे, सानिका तोरसकर, अतुल साबळे, मनोज गुळवे, प्रतीक वायसे, प्रतीक शिंदे, साक्षी माने, फैजल सय्यद, सुषमा काशीद, राजीव वाडकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पूर्वी लघुपट, आता संपूर्ण चित्रपट
यापूर्वी बिलिंदर आणि अबोल हे मराठी लघुपट यशस्वीपणे सादर केल्यानंतर, लवेरिया हा दोन तासांचा संपूर्ण व्यावसायिक चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यात आला आहे. चित्रपटात रोमँटिक आणि हृदयस्पर्शी गाणी असून, त्याचे संगीतही विशेष आकर्षण ठरणार आहे.
१४ फेब्रुवारीला मराठी सिनेरसिकांसाठी खास भेट
मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची संधी न मिळणाऱ्या प्रेक्षकांसाठी लवेरिया हा सिनेमा मोफत पाहण्याचा सुवर्णसंधी आहे. १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट धाकल पाटील YouTube चॅनेलवर प्रदर्शित होणार असल्याने, मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा अनुभवण्याचे आवाहन निर्मात्यांनी केले आहे.