लग्न मंडपातून चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न; मंडळींनी चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन
By : Polticalface Team ,13-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
प्रत्येकाला आपलं मुल फार प्रिय असतं. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बाळाची डोळ्यात अगदी तेल घालून काळजी घेतात. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळक्याने काल देखील एका चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रस्त्यावर एका लॉन्समध्ये रात्री लग्नसमारंभ पार पडत होता. या लग्न समारंभामधून एका छोट्याशा चिमुकलीला घेऊन एक व्यक्ती तिचे अपहरण करत होता. चिमुकलीला घेऊन भिंतीवरून उडी मारत असताना काही सजक नागरिकांनी त्याला पाहिले आणि त्यानंतर त्याला पकडून विचारपूस केली.
चिमुकलीचे अपहरण करत असताना या व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आले. आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांच्या हे लक्षात येताच नागरिकांनी संताप व्यक्त करत त्याला चांगलाच चोप दिला आहे.
लग्नात कोणतेही बाधा नको यासाठी नागरिकांनी आपली शक्कल लढवली आणि त्या व्यक्तीला बेदम चोप देऊन मंगल कार्यालयातील एका खोलीत डांबून ठेवले आहे. तसेच पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एका खोलीत बंद करून ठेवलेल्या त्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
लहान मुलांचे अपहरण करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. सदर व्यक्ती याच टोळीतील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे पोलीस या व्यक्तीची कसून चौकशी करत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम देखील सुरू आहे
वाचक क्रमांक :