छत्रपती संभाजीनगरमध्ये साकारणार जिजाऊ माँसाहेब आणि राजमाता अहिल्याबाई यांचे पुतळे, मुख्यमंत्र्यांची मान्यता
By : Polticalface Team ,15-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजमाता जिजाऊ आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या हर्सुल टी पॉइंट, सेंट्रल जेल समोर येथील चौकात उभे करण्यास मान्यता दिली आहे.
या ठिकाणी दोन्ही प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे पुतळे उभे करावेत अशी मागणी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल हे ही हजर होते. पुतळे उभारण्याची मागणी शिंदे यांनी तातडीने मान्य केली. तसे आदेश महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिले. त्याबद्दल विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. राजमाता जिजाऊ आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर या दोन थोर व्यक्तिमत्त्वांचे पुतळे छत्रपती संभाजीनगर येथे जी20 परिषदेच्या निमित्ताने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या हर्सुल टी पॉईंट, सेंट्रल जेलसमोरील चौकात लवकरच उभे राहतील आणि छत्रपती संभाजीनगरचे वैभव वाढवतील अशी खात्री विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जिजाऊ आणि राजमाता अहिल्याबाई यांनी आपल्या कार्यातून आदर्श माता कशी असते हे दाखवून दिले आणि जागतिक मातृत्व दिनाच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे याबद्दल विनोद पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
वाचक क्रमांक :