आता कचरागाडी ट्रॅक करता येणार, फोन करताच गाडी घरासमोर!
By : Polticalface Team ,19-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचे सूत्र हाती घेताच जी.श्रीकांत यांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शहरातील कचरा संकलित करणाऱ्या घंटागाडीबाबत देखील त्यांनी आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. घंटागाडी घराजवळ आलेली आहे किंवा तुमच्या घरातून किती अंतरावर आहे हे ट्रॅक करण्यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्याची सूचना जी श्रीकांत यांनी दिल्या आहेत. त्यांनी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली या निमित्त त्याच ठिकाणी घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते.
घंटागाडीवर गाणे वाजवणे किंवा शिट्टी वाजवण्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन एक अप्लिकेशन तयार करावे, जेणेकरुन नागरिकांनी ते ॲप डाऊनलोड केल्यावर घंटागाडी त्यांच्या घराच्या किती जवळ आलेली आहे, किती अंतरावर आहे, तसेच घंटागाडी आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ आहे आणि घंटागाडी आपल्या घरातून किती मीटरच्या अंतरावर आहे हे कळेल.
तसेच ज्या कुटुंबात सगळे सदस्य नोकरी किंवा कामावर जातात. घंटागाडीत त्यांना कचरा टाकता आला नाही त्यांच्यासाठी टू व्हीलरवर कचरा संकलन करुन तो कचरा ट्रान्सफर स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण करावे अशी संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. तसेच या सेवासाठी शुल्क आकारण्यात यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली. याशिवाय त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाच्या आढावा घेतला आणि कचरा संकलन तसेच वाहतुकीबाबत माहिती घेतली.
वाचक क्रमांक :