मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 मे रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,23-05-2023
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे येत्या 26 मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अनेक शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. विशेष या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आढावा घेतला. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या याच कार्यक्रमाबद्दल आणि नियोजनाबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सविस्तर माहिती दिली. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जनार्दन विधाते यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना जेवण, पाणी तसेच उन्हाची तीव्रता पाहता ताक देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी केंद्र ठिकठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी 18 प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी कन्नड येथील टोल नाका सर्वांसाठी खुला करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली सभास्थळाची पाहणी
कन्नड शहरात 26 मे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभास्थळाची पाहणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हात या सभास्थळाची पाहणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी करून आढावा घेतला. सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे स्थानिक नेते या सभेची जोरदार तयारी करत आहेत.
‘शासन आपल्या दारी’ अभियान राज्यभरात राबवले जात आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत नागरिकांना वेगवेगळ्या विभागाच्या शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरात शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे हा सर्व कार्यक्रम शासकीय असल्याने प्रशासन कामाला लागलं आहे. जिल्हाधिकारी यांच्यापासून तर तहसीलदार आणि गावचे तलाठी देखील या कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्थ असल्याचे पाहायला मिळत आहे. तर वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी नियोजनाचा आढावा घेत आहे.
वाचक क्रमांक :