घरमालकाचा मुलगा दारू पिऊन आला, गरीब विद्यार्थ्यांना मारहाण,पैसे घेऊन फरार(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,02-06-2023
छत्रपती संभाजीनगर:दारूच्या नशेत घरमालकाच्या मुलाने शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर पैशासाठी चाकू हल्ला केला. यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाले. इतर दोघांना मार लागला आहे. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक घटना बुधवारी रात्री टीव्ही सेंटर भागात उघडकीस आली. या प्रकरणी सिडको पोलीस कारवाई करत आहे.
या प्रकरणी जखमींच्या नातेवाईकांनी माहिती दिली. प्रमोद पंढरीनाथ गायकवाड, निवृत्ती कडूबा कावळे, रवी जगन्नाथ गायकवाड आणि अभिषेक गोकुलादास गायकवाड हे फुलंब्री तालुक्यातील वाघोळा या गावचे चार विद्यार्थी आहेत. दहावी बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील खासगी शिकवणीचे क्लास करण्यासाठी शहरामध्ये आले. या चारही मुलांचे आई-वडील मोलमोजुरी करण्याचं काम करून उदरनिर्वाह भागवतात.
पीडित विद्यार्थी टीव्ही सेंटर भागामध्ये रूम करून राहतात. काही दिवसांमध्ये शिकवणीचे पैसे भरण्यासाठी आई-वडिलांनी त्यांना पैसे आणून दिले होते. यामुळे प्रत्येकाजवळ ४० ते ५० हजार रुपये होते. चार विद्यार्थ्यांचे मिळून एकूण दोन लाख रुपये रक्कम रूममध्ये ठेवली होती. या पैशाची माहिती घरमालकाच्या मुलाला मिळाली. यानंतर घरमालकाचा मुलगा दारू पिऊन आला आणि मुलांना मारहाण करत पैशांची मागणी केली. एवढ्यावर न थांबता त्याने विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. यानंतर घरमालकाचा मुलगा विद्यार्थ्यांजवळीचे पैसे घेऊन पसार झाला. या हल्ल्यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याच्यासह इतर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर पैशासाठी चाकू हल्ला केल्याने सर्व स्तरातून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.
वाचक क्रमांक :