बदनामीपोटी नवजात मूल टाकून देणारी कुमारीमाता पोलिसांच्या ताब्यात(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,04-06-2023
छत्रपती संभाजीनगर:प्रेमप्रकरणातून जन्मलेले नवजात अर्भक टाकून देणाऱ्या कुमारी मातेला क्रांतीचौक पेालिसांनी शनिवारी शोधून काढले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही महिला कैद झाल्याने पोलिसांनी तिला आज ताब्यात घेतले. समाजात बदनामी होईल म्हणून हे बाळ टाकून दिल्याची कबुली तिने पोलिसांना दिली.
पोलिसांनी सांगितले की, कोटला कॉलनीतील शनि मंदीराजवळ २५ मे रोजी पुरूष जातीचे नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेऊन महिला व बालकल्याण समितीच्या आदेशाने ते बाळ संगोपनासाठी बालगृहात ठेवले होते. याप्रकरणी अज्ञात मातेविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तपासामध्ये एक महिला बाळ घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिसांनी आज तिला शोधून काढले तेव्हा ती रडायला लागली. ती कुमारी माता असून बहिणीकडे राहते. धुणीभांडीचे काम करते. एका विवाहित वाहनचालकासोबत त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यातून तिला गर्भधारणा झाली. तेव्हा त्याने तिचा आणि तिच्या बाळाचा सांभाळ करण्याची तयारी दर्शविली. मात्र लग्नाआधी बाळ झाल्याने समाजात बदनामी होईल या भितीपोटी तिने प्रसूतीनंतर हे बाळ त्याच्या परस्पर २५ मे रोजी टाकून दिल्याचे तिने कबुल केले.
पोलिसांनी तिच्या प्रियकरालाही शोधून आणले तेव्हा तिने बाळ टाकून दिल्याचे त्यास सांगितले नसल्याचे तो म्हणाला. तिनेही हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. आता त्याने त्या बाळाचा सांभाळ करण्याची तयारी दर्शविली आहे. असे असले तरी बाळ टाकून दिल्याच्या गुन्ह्यात पोलिस त्या अभागी मातेवर कारवाई करणार आहेत. आई, वडिल आणि त्या बाळाची डिएनए तपासणी करण्यात येणार आहे.त्यांचे डीएनए जुळल्यानंतरच ते बाळ त्याच्या आईच्या ताब्यात द्यावे अथवा नाही, याबाबतचा निर्णय महिला व बालकल्याण समिती घेईल,असे पोलिसांनी सांगितले.
वाचक क्रमांक :