झाडाखाली पडलेला आंबा उचलला म्हणून पर्यटकाला बेदम मारहाण(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,09-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीबी का मकबरा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाने आंब्याच्या झाडाखाली पडलेला आंबा उचलला म्हणून तेथील आंब्यांचे टेंडर घेतलेल्या टेंडरधारक व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ७ जून रोजी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ सोलापूरचे रहिवासी असलेले कलीम गौसउद्दीन शेख (वय ४२) हे ७ जून रोजी पत्नी व भावासोबत मकबरा पाहण्यासाठी गेले होते. दुपारी मकबरा पाहत असताना तेथील उद्यानात ते गेले. उद्यानातील एका आंब्याच्या झाडाखाली पडलेला आंबा दिसताच कलीम यांना तो उचलण्याचा मोह झाला. त्यांनी ताे उचलताच आंब्याचे टेंडर घेतलेल्या शेख छोटू शेख रहेमान (५०) याने साथीदार शेख तौफिक शेख छोटू (२४, दोघेही रा. जयसिंगपुरा), फैसल बाबू शेख व अन्य एकाने त्यांना थेट मारहाण सुरू केली.
एकाने बांबूच्या काठीने त्यांच्यावर प्रहार केले. कलीम यांनी स्वत:ची सुटका करत ते प्रवेशद्वाराजवळ गेले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करत बाहेर पकडून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात कलीम गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात उपचार घेऊन बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
वाचक क्रमांक :