कपाटाचे लॉक दुरुस्त करायला आला;दागिने चोरून गेला!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,19-06-2023
घरातील लॉक दुरुस्त करण्यासाठी आलेल्या कारागिराने त्याच कपाटातील तिजोरीतून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना एन-७, अयोध्यानगरात १६ जून रोजी दुपारी पावणेचार वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी चावी बनविणाऱ्या अनोळखी संशयिताविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती एन-७, अयोध्यानगर भागात राहते. दरम्यान राहत्या घरातील कपाटाचे लॉक दुरुस्त करण्यासाठी दोघा पती,पत्नींनी एका कारागिराला बोलाविले होते. कारागीर कपाटाचे लॉक दुरुस्त करत असताना त्याने फिर्यादी महिलेच्या पतीची नजर चुकवून कपाटातील तिजोरीवर डल्ला मारला आणि तिजोरीतील २० हजारांची अंगठी, १६ हजारांचे गळ्यातील लॉकेट, चार हजारांच्या कानातील बाळ्या, दोन हजारांचे चांदीचे हातातील कडे, दोन भार वजनाच्या चौदाशे रुपयांच्या चांदीच्या बाहोट्या, रोख दहा हजार असा एकूण ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार तडवी हे करत आहेत.
वाचक क्रमांक :