बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली(योगेश मोरे,छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,21-06-2023
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने यंदा अभिनव प्रयोग केला. ६ विषयांचे एकच पुस्तक तयार केले. पण निकृष्ट बांधणीमुळे पुस्तकाला २०० पानाचे ओझे सहन होईना?शाळा सुरू होऊन तीन दिवसात पुस्तकाची पाने साथ सोडू लागली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी-पालक शाळेत तक्रार करीत आहेत; पण घरीच पुस्तकाला पाने चिटकवून घ्या असा सल्ला शिक्षक देत आहेत. यामुळे पुस्तक बांधणीच्या गुणवत्ता तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना या पथदर्शी प्रकल्प यंदा राबविण्यात येत आहे. विद्यार्थी एकाचवेळी सर्व विषयांचे पुस्तक दप्तरात नेत असे. त्याऐवजी सर्व विषयाचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले. मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीसाठी पाठ्यपुस्तकांचे चार भाग तयार करण्यात आले. चारही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. त्यातील भाग पहिला विद्यार्थी शाळेत घेऊन जात आहे. इयत्ता सातवीच्या पुस्तकात पहिल्या भागात १९४ पाने देण्यात आली आहेत. शाळा सुरू होऊन तीन दिवस झाली. वारंवार एकच पुस्तक हाताळले जात असल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी होऊ लागली आहेत. एकच नाही तर प्रत्येक शाळेत पुस्तक फाटल्याची तक्रारी विद्यार्थी करीत आहेत. काही पालकांनी पाने चिटकविली, तर काही पालकांनी जाड दोऱ्याने पुस्तक बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बालभारती पुस्तकांची बांधणीची गुणवत्ता तपासते की नाही, असा प्रश्न आता यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. फाटके पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत जावे का?असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
वाचक क्रमांक :