अखेर मुंढेकरवाडी सेवा संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती सहाय्यक निबंधक यांनी बजावला आदेश!
By : Polticalface Team ,Sun May 08 2022 14:30:57 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढेकरवाडी सेवा संस्थेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीगोंद्याचे सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी प्रशासक नियुक्तीचा आदेश बजावला आहे. त्यामुळे आता पुन्हा या संस्थेची सहा महिन्यानंतर पुन्हा फेरनिवडणूक होण्याची नामुष्की ओढवली गेली आहे.
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी सेवा संस्था ही राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची संस्था समजली जाते. या संस्थेचे जवळपास 1200 सभासद असून, मतदानासाठी मात्र काही मयत व काही सभासद थकबाकीत असल्याने 930 सभासद क्रियाशील म्हणून पात्र आहेत. अशीदेखील माहिती समोर येत आहे.या संस्थेची नुकतीच 5 मार्च रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत नागवडे आणि पाचपुते नहाटा या दोन्ही गटांमध्ये अटीतटीची निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकीत सभासदांनी समसमान कौल दिल्याने बहुमत मात्र कोणत्याही गटाला सिद्ध करता आले नाही. श्रीगोंद्याचे सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी निवडणूक पार पडल्यानंतर काही दिवसात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी दोन वेळेस नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु पहिल्या बैठकीला दोन्हीही गटाचे संचालक उपस्थित नव्हते. तर दुसऱ्या बैठकीला मात्र नागवडे गटाचे सर्व सहा संचालक उपस्थित होते असे समजते. सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी दोन्ही गटांकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांमध्ये एक मत होत नसल्याने अखेर या संस्थेवर सहकार कायद्यानुसार आता सहा महिन्यासाठी प्रशासक म्हणून सहकारी बँकेचे शाखाधिकारी बी व्ही उंडे यांची 22 एप्रिल 2022 रोजी एका अध्यादेशानुसार नियुक्ती केली आहे. तशा प्रकारचा आदेश मुंढेकरवाडी सेवा संस्थेला बजावला आहे. सहकार कायदा 1960 या कायद्याअंतर्गत आता या संस्थेवर प्रशासक कारभारावर पाहणार आहेत. सहा महिन्याचा प्रशासकीय कारभार संपन्न झाल्यानंतर या संस्थेची फेर निवडणूक होऊ शकते. असा सहकाराचा नियम आहे. आता पुन्हा निवडणूक झाली तर त्या उमेदवारांना पुन्हा सभासदांकडे मते मागण्यासाठी जावे लागणार आहे. त्यावेळेस मात्र अर्थकारणही वेगात फिरणार आहे. अशा सर्व प्रक्रियेला जे उमेदवार उभे राहतील त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान या संस्थेची पाच मार्च रोजी पार पडलेल्या निवडणूक दरम्यान 12 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या संस्थेत मागासवर्गीय सभासद नसल्याने दोन्ही गटांना मागासवर्गीय उमेदवार देता आले नाही या पार पडलेल्या निवडणुकीत नागवडे गटाचे सहा तर पाचपुते नहाटा गटाचे सहा असे समसमान संचालक निवडून आल्याने पुढे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी या दोन्ही गटाकडून शर्यतीचे प्रयत्न करण्यात आले परंतु या दोन्ही गटाचे संचालक ठाम राहिल्याने अखेर सहाय्यक निबंधक यांनी सहकार कायदा कलम (77 अ) (1-अ ) (ब-1) व (ड) नुसार प्रशासक नियुक्ती शिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे या सहकारातील कायद्यानुसार आता किमान सहा महिने तरी या संस्थेवर प्रशासकांनाच कारभार पहावा लागेल. असे चित्र तूर्त तरी या संस्थेचे निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पंचवीस वर्षापासून ही संस्था आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाकडे होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत नागवडे गटाने कडवी झुंज देत ही संस्था पाचपुते यांच्या गटाला बहुमता पासून दूर ठेवण्यात मोठे यश मिळविले आहे. आता सहा महिन्यानंतर या संस्थेची फेर निवडणूक होणार का?. निवडणूक झाली तर कोणता गट बहुमत मिळवणार? हे आता सहा महिन्यानंतर स्पष्ट होणार आहे. तशी चर्चा सद्यस्थितीला मुंढेकरवाडी संस्थेच्या सभासदांमधून होताना दिसते.
वाचक क्रमांक :