या दांपत्याने वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेला 50 हजार रुपयांची देणगी देऊन एक आदर्श निर्माण केला.
By : Polticalface Team ,Wed Jul 13 2022 15:28:55 GMT+0530 (India Standard Time)
कोल्हापूर (प्रतिनिधी गजानन कोकितकर): कडलगे खुर्द येथील शिक्षक लक्ष्मण पांडुरंग पाटील यांनी वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गावातील प्राथमिक मराठी शाळेला 50 हजार रुपयांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. या मदतीतून मुलांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
लक्ष्मण पाटील हे गुडेवाडी येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे सेवेत आहेत. शिक्षकी पेशात असताना त्यानी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख असून गावातील प्रत्येक समाजकार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. दोन महिन्यापूर्वी गावातील जळीतग्रस्त कुटुंबाला सर्वप्रथम मदत करून त्या कुटुंबाला नवे घरकुल उभे करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. गावातील मुले शिक्षणातून पुढे आली पाहिजेत, असे विचार त्यांच्या वडिलांचे होते. गतवर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर यंदा प्रथम स्मृती दिनानिमित्त वडिलांच्या विचारांना बांधील राहून लक्ष्मण पाटील यांनी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. स्मृतीदिनादिवशीच लक्ष्मण पाटील व ज्योती पाटील या दाम्पत्याने शाळा व्यवस्थापन कमिटीकडे 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी रविकिरण सुरेश, अर्जुन पाटील वसंत पाटील सुबराव पाटील नारायण पाटील पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. हल्ली सरकारी नोकरदारांना भरमसाठ वेतन असताना आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा समाजासाठी खर्च करणाऱ्या व्यक्ती अपवादानेच दिसतात. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण पाटील यांचे दातृत्व अनुकरणीय असल्याची चर्चा आहे.
श्री.लक्ष्मण पाटील सर हे गाव कडलगे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूरचे आहेत हे शिक्षक म्हणून स्वामी विवेकानंद विद्यालय गुडेवाडी या स्कूलमध्ये कार्यरत आहेत हेच शाळेमध्ये सगळेच उपक्रम राबवतात अगदी सगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतात व शाळेचे नाव केंद्रापर्यंत पोहोचविले आहे