By : Polticalface Team ,Sat Aug 06 2022 17:03:00 GMT+0530 (India Standard Time)
जिल्ह्यात एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मदतीचं आश्वासन देऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केले. यानंतर आरोपींनी महिलेला रस्त्याकाठी फेकून देत पळ काढला. सध्या महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
पीडित महिला गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. यावेळी 30 जुलैला तिचे बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती आईकडे निघाली असताना रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. पण त्या नराधमानं तिला घरी सोडलं नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही 31 जुलैला जंगलात नेऊन अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला.
पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील एका ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी 2) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतर त्यांनी घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.
गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याबाबत माहिती दिली. मग पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पीडितेला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे वाचक क्रमांक :