आम्ही देखील दीड महिन्यापूर्वी 50 थरांची दहीहंडी फोडली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By : Polticalface Team ,Fri Aug 19 2022 18:46:55 GMT+0530 (India Standard Time)
ठाणे : आम्ही देखील दीड महिन्यापूर्वी 50 थरांची दहीहंडी फोडली, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीका केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गोपाळांसाठी राज्य सरकारने मोठ्या घोषणा केल्यात. दहीहंडीला खेळाचा दर्जा सरकारने दिला आहे.
एवढंच नाही तर सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील गोपाळांसाठी आरक्षण दिलं. गोपाळांसाठी 10 लाखांचा विमा सरकारने जाहीर केलाय. कोणीही या खेळात जखमी होऊ नये, मात्र दुर्देवाने जखमी झालं तर त्यासाठी आम्ही 10 लाखांचा विमा जाहीर केलाय.
हे सरकार गोपाळांच सरकार आहे म्हणून सरकारने तुमची काळजी घेतलीय. तर आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी दही हंडी फोडली, आम्ही तर 50 थर लावले होते, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभीनाका येथील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरसह अनेक जण उपस्थित होते.
वाचक क्रमांक :