मुंबई : बारसू-धोपेश्वर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतल्यानंतर कोकणातील वातावरण चांगलचं तापू लागलंय. कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात स्थानिकांनी तीव्र आंदोलन केलंय. आंदोलक महिलांनी राजन साळवी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. उद्योग मंत्री उदय सामंत हे दिशाभूल करत असून ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध असल्याचे रिफायनरी विरोधी आंदोलकांनी सांगितले. कोकणात, पर्यावरणपूरक प्रकल्प आणण्याची मागणीदेखील यावेळी स्थानिकांनी केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला आमदार साळवी हजर राहिले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. आता, त्याचे पडसाद आता कोकणातल्या रिफायनरी होणाऱ्या गावांमध्ये दिसू लागले आहेत.
साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर या भागातील महिलांनी बुधवारी संध्याकाळी एकत्र येत आंदोलन केले. आंदोलक महिलांनी राजन साळवी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. फोटोवर शेण फेकून मारले. यावेळी आमदार राजन साळवी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीती कोकणचा विनाश करणारा प्रकल्प आणू देणार नसल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले
वाचक क्रमांक :