By : Polticalface Team ,05-12-2022
शेतीपंपाची सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी.ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये मदत मिळावी. श्रीगोंदा तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता किमान ३१०० रुपये द्यावा. पंचायत समिती कार्यालयात गायगोठा अनुदानासाठी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी.लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी.जनावरांचे सर्व आठवडे बाजार सुरू करण्यात यावे.या सर्व मागण्यासाठी हे अनोखे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.
यावेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के बोलत असताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो.दरवेळी आंदोलने करावी लागतात. मोर्चा,आंदोलने,उपोषणे करून देखीलही प्रशासनाला घाम फुटत नाही. म्हणून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरिता व यांना योग्य सद्बुद्धी मिळण्याकरिता आज तहसील कार्यालयासमोर देवा खंडेरायाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्याची वेळ आली.
या अनोख्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार कुलथे साहेब गटविकास अधिकारी जगताप साहेब,महावितरणचे सर्व अधिकारी हे आंदोलन आंदोलन स्थळी उपस्थित राहिले. ट्रांसफार्मर न सोडता वसुली करू,पंचायत समितीच्या निगडित प्रश्नांसंदर्भात लवकरच आढावा बैठक घेऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.