सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत दागिने घेऊन पळालेल्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात.
By : Polticalface Team ,06-12-2022
श्रीगोंदा प्रतिनीधी:-
सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत दागिने घेऊन दुचाकीवरून पळालेल्या दोघांना नागरिकांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले . ही घटना श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथे घडली आहे . आर्यन अजय गुप्ता , तबारक मुबारक शेख रा . जमुनिया , भागलपूर बिहार असे अटक केलेल्या दोन आरोपींचे नाव आहे . सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी एका महिलेच्या घरी येऊन आम्ही कंपनीची माणसे असून आम्ही पीतळचे भांडे , सोन्याचे तसेच चांदीचे दागिने उजळून देतो , असे सांगितले . त्यावर विश्वास ठेवत महिलेने कानातील अंदाजे अडीच ग्राम वजनाचे सोन्याची कर्णफुले तसेच सूनेचे अडीच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असे दागिने उजळण्यासाठी दिले . दोघा आरोपींनी दागिन्यांना पावडर आणि पाणी लावून डब्यात टाकल्यासारखे करत डबा बंद करत हळद टाकून गॅसवर १० मिनिट ठेवण्यास सांगितले आणि आरोपी निघून गेले . काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार मुलाला सांगितला . मुलाने मित्रांच्या मदतीने दोघांचा शोध घेतला . दोन्ही लोणी व्यंकनाथ मडकेवाडी शिवारात दुचाकी क्र . एम एच १२ ई व्ही ७२३० वरून पळून जात असताना पकडले व श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले . याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात निकिता घोडके यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहेत .
वाचक क्रमांक :