चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; शाईफेक करणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
By : Polticalface Team ,10-12-2022
पिंपरी चिंचवड : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा प्रश्न करत चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती, असं वक्तव्य केलं. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शाईफेक करणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी गेले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानं आता वातावरण आणखी चिरघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधकांकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.
वाचक क्रमांक :